पणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल येथील युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्पाविरोधात सुरू असलेले आंदोलन मंगळवारी गंभीर वळणावर पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी पंचायतीसमोर उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार सकाळपासून आंदोलन सुरू झाले होते. त्यावेळी पंचायत परिसरात पोलिस व आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला.
इंदिरानगर येथील पंच सदस्य शंकर नाईक यांनी सोशल मीडियावर आंदोलनकर्त्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे संतप्त झालेल्या जमावाने माफीची मागणी करत शंकर नाईक यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी शंकर नाईक व नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. महिलांच्या अंगावर धाव घेतल्याचा आरोप झाल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या कारवाईत महिला आंदोलनकर्त्यांसह अनेकजण जखमी झाले. गेली १७ दिवस आंदोलन शांततेत सुरू होते, मात्र, पंच शंकर नाईक यांच्या वक्तव्यामुळे लोक आक्रमक झाल्याचा आरोप आंदोलनाचे नेतृत्व करणारे अजय खोलकर यांनी केला.
लाठीचार्जचा आदेश देण्यात आलेल्या मामलेदारांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी पंच सदस्य शंकर नाईक यांना पोलिसांनी संरक्षण देत बाहेर काढले. दरम्यान, सरपंच संदेश शिरोडकर यांनी युनिटी मॉल प्रकल्पाला पंचायतीने परवाना दिलेला नसल्याचे स्पष्ट करत, आपण लोकांसोबत असल्याचे सांगितले. प्रकल्पाबाबतचा अंतिम निर्णय बुधवारी अपेक्षित असून त्यानंतर पंचायत बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.
आंदोलकांसोबत आज बैठक :
मुख्यमंत्री युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना भेटण्यास आपण तयार आहे. बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजता त्यांची पर्वरी मंत्रालयातील माझ्या चेंबरमध्ये ही बैठक घेतली जाईल. या प्रकल्पाबाबत असलेल्या त्यांच्या शंका ऐकल्या जातील. त्यांनी या बैठकीस यावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत जाहीर केले.