पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांची तीव्रता विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिक वाढली आहे. है. युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ या प्रकल्पांविरोधात आंदोलन करणाऱ्या चिंबलवासीयांनी आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी धडक दिली. तर तुये इस्पितळ गोमेकॉला लिंक करावे, या मागणीसाठी कृती समितीने साखळी उपोषणाला सुरुवात केली.
मनरेगा ही योजना सरकारने बंद केल्याचा आरोप करत काँग्रेसने जुने गोवे आणि मडगावात निदर्शने केली. दरम्यान, १५ रोजी महाआंदोलनाचा इशारा चिंबल ग्रामस्थांनी दिला असून, त्याच दिवशी मशाल मोर्चा काढण्याचा निर्धार तुये इस्पितळ कृती समितीने जाहीर केला आहे.
चिंबलवासीयांचे १५ रोजी महाआंदोलन कदंब पठार येथील प्रस्तावित युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्पाविरोधात सुरू केलेल्या चिंबलवासीय आंदोलनकर्त्यांनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी धडक दिली. यावेळी तेथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनकर्त्यांना कोणतेच ठोस आश्वासन मिळाले नसल्याने येत्या गुरुवारी (१५ जानेवारी) महाआंदोलनाद्वारे सचिवालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला. आमदारांनी आंदोलनकर्त्यांमधील पाचजणांच्या शिष्टमंडळाला भेटण्यास बोलावले मात्र त्यांनी नकार दिला. पाठिंबा असल्याचे खोटे आश्वासने देऊन आमदारांनी चिंबलवासियांची फसवणूक केल्याच आरोप यावेळी करण्यात आला.
युनिटी मॉलला विरोध आहे की नाही याचा जाब विचारण्यासाठी कदंब पठार येथून चिंवलवासियांचा मोर्चा आज सकाळी चालत आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानाकडे निघाला. सुमारे दोनशेहून अधिक चिंबलवासीय या मोर्चात सामील झाले होते. निवासस्थानाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हा मोर्चा निवासस्थानकडे जाण्यापूर्वीच रस्त्यावर अडवण्यात आला. त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी त्यांचे पाचजणांचे शिष्टमंडळाला बोलावले मात्र मोर्चाचे नेतृत्व करत असलेल्या पंचाय जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर व आंदोलनकर्त्यांनी नकार दिला.
आमदारांनी आंदोलनकर्त्यांसमोर येऊन त्यांची म्हणणे स्पष्ट करण्याची मागणी केली. मात्र, आमदारांनी येण्यास नकार दिला. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे गोवा विभागचे नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष वाल्मिकी नाईक सामील झाले होते. यावेळी गोविंद शिरोडकर यांनी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या युनिटी मॉलसंदर्भातच्या भूमिकेबाबत आरोप केले. त्यांनी लोकांना आश्वासन देऊन पलटी मारली आहे.
तळाच्या बचावासाठी स्थानिक चिंबलचे लोक आपला उदारनिर्वाहाचा व्यवसाय बंद ठेवून विरोध करत आहेत. मात्र स्थानिक आमदारांना त्याचे सोयरसुतक नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे मात्र ते फिरकलेही नाहीत.
त्यामुळे आंदोलनकर्त्यांनाच त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढावा लागला असे ते म्हणाले. पोलिस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न करता आंदोलनकर्ते आमदारांच्या निवासस्थानाकडून चिंबलच्या नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य गौरी कामत यांच्या घराकडे कूच केली.
आंदोलनकर्त्यांना त्या भेटल्या. या प्रकल्पासंदर्भात बहुमत असलेल्या लोकांबरोबर असेन असे उत्तर दिले. त्यानंतर हा मोर्चा चिंबल पंचायतीकडे नेण्यात आला व दिवसभर तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.