चिंबल येथील युनिटी मॉलविरोधी आंदोलकांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली भेट
मंगळवारपर्यंत तोडगा काढण्याचे व नागरिकांना विश्वासात घेण्याचे आश्वासन
मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर महामोर्चा मागे, मात्र मुख्य आंदोलन सुरूच
जमावबंदीमुळे विधानसभेवर मोर्चा न नेता महामार्गावर धरणे आंदोलन
तोय्यार तळ्याला कोणताही धोका होणार नाही, नोटिफिकेशन काढून भाग वगळण्याची ग्वाही
पणजी : चिंबल येथील युनिटी मॉलला विरोध करणाऱ्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आंदोलनस्थळी दाखल झाले. मंगळवारपर्यंत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन देत तोपर्यंत आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली.
मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत आंदोलकांनी प्रस्तावित महामोर्चा मागे घेतला. मात्र प्रश्न पूर्णतः सुटेपर्यंत चिंबल येथील मुख्य आंदोलनस्थळी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
गुरुवारी सकाळपासूनच मोठ्या संख्येने आंदोलक चिंबल येथे जमा होऊ लागले होते. ठरल्याप्रमाणे युनिटी मॉलविरोधात विधानसभेवर मोर्चा नेण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र जमावबंदी आदेश लागू असल्याने आंदोलकांनी चिंबल येथेच महामार्गावर धरणे आंदोलन केले. अजय खोलकर आणि गोविंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात आला.
प्रशासन आणि आंदोलकांनी संयम व सामंजस्य दाखवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विधानसभेचे सत्र संपल्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी थेट संवाद साधला आणि त्यांना आश्वासन दिले.
युनिटी मॉल हा केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याने त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येईल. मात्र तोय्यार तळ्याला कोणताही धोका पोहोचू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत त्या परिसरासाठी स्वतंत्र नोटिफिकेशन काढून आवश्यक तो भाग वगळण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.