पणजी : पुढारी वृत्तसेवा
सरकारने सर्व कायदेशीर परवाने घेतले असले तरीही चिंबलच्या जैवविविधतेचे व तळ्याचे अस्तित्व नष्ट करण्यास कारणीभूत ठरणारे प्रशासन स्तंभ आणि युनिटी मॉल हे प्रकल्प चिंबलमधील कदंब पठारावार नकोच, ही आमची मागणी असून त्यासाठी कोणत्याही संघर्षाला आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन चिंबल जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी केले.
गुरुवारी (दि. ८) कदंब पठारावार होऊ घातलेल्या सरकारच्या युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ या प्रकल्पांना विरोध करत गेले ११ दिवस उपोषण व आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी गोविंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली चिवल पंचायतीसमोर जोरदार निदर्शने केली.
चिंबल पंचायतीने या प्रकल्पासाठी दिलेले परवाने त्वरित मागे घेण्याची मागणी केली. यावेळी बोलताना गोविंद शिरोडकर म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या संदर्भात चर्चेसाठी या, असे आम्हाला आवाहन केले आहे, मात्र पूर्वी आम्ही स्थानिक आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून हे दोन्ही प्रकल्प पुढे नेऊ नका, असा इशारा दिला होता.
मात्र तरीही प्रकल्प पुढे नेले जात आहेत आणि आता पुन्हा कोणती चर्चा मुख्यमंत्री आमच्याशी करणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करून ग्रामसभेत या दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात ठराव घेतलेले असतानाही सरकार हे दोन्ही प्रकल्प पुढे नेत असून भावी पिढीसाठी येथील जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही लढाई लढत आहोत, असे शिरोडकर म्हणाले.
येत्या विधानसभा अधिवेशनात चिंबलमध्ये प्रशासन स्तंभ आणि युनिटी मॉल नको असा ठराव आमदारांनी दाखल करावा. जे चार आदिवासी आमदार आहेत यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सर्व आमदारांनी त्यांच्या या ठरावाला पाठिंबा द्यावा अशी मागणी यावेळी शिरोडकर यांनी केली.
इंदिरानगरच्या नागरिकांना इशारा
चिंबल पंचायत क्षेत्रात इंदिरानगर येथे परप्रांतीयांची जी वस्ती अनेक वर्षापासून आहे त्यामुळे चिंबलच्या नागरिकांना त्रास होत आहे. युनिटी मॉल प्रकल्पाच्या संदर्भात चिंबलचे नागरिक आंदोलन करत असताना इंदिरानगरचे लोक त्यामध्ये सहभागी होत नाहीत. त्यांनी सरकारी प्रकल्पाला पाठिंबा दिला तर त्यांना ते महागात पडेल, असा इशारा यावेळी गोविंद शिरोडकर यांनी दिला.