पणजी : राज्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्याप ज्ञानदानास वेग आलेला नाही. नव्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून मिळालेले नाहीत. नवी पुस्तके बाजारात हळूहळू उपलब्ध होत आहेत. वह्यांचीही खरेदी सुरू आहे. सर्व वर्गाची पुस्तके अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. येत्या चार दिवसांत ती होणार आहेत.
सरकारी प्राथमिक शाळांत शिकणार्या पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत रेनकोट, गणवेश, वह्या व पुस्तके दिली जाणार आहेत. मात्र, ती अद्याप पुरवली गेलेली नाहीत. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेनकोट व गणवेश पूर्वी शिक्षण खाते देत होते. मात्र, आता या दोन्हींचे प्रत्येकी 500 व 600 रुपये थेट विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात जमा केले जातात. पालकांचे बँक डिटेल्स मिळवून ते शिक्षण खात्याला पाठवण्याची सूचना शाळांना केलेली आहे. बँक डिटेल्स मिळाल्यानंतर पालकांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे झिंगडे म्हणाले.
‘प्राथमिक’च्या विद्यार्थ्यांसाठी नोटबुक
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नोटबुक मोफत दिले जातात. गतवर्षी माहिती व प्रसिद्धी खात्याने हे नोटबुक दिले होते. यावेळी शिक्षण खातेच त्या नोटबुक देणार आहेत. त्याबाबत निविदा काढली जाणार असल्याचे सांगून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खाते मोफत पुस्तके उपलब्ध करते. ती पुस्तके येत्या काही दिवसांत वितरित केली जातील, असे झिंगडे यांनी सांगितले.
अनेक शाळांत नव्या सुविधा
राज्य सरकारने काही शाळा नव्याने बांधल्या. काही शाळांच्या जुन्या इमारती तशाच ठेवून बाजूला नव्या इमारती बांधल्या. काही हायस्कूल इमारतींची दुरुस्ती केली, शाळासाठी शौचालये बांधली, स्मार्ट वर्ग तयार केले, पिण्याच्या पाण्याची सोय केली. संगणक उपलब्ध केले. इतर गरजेच्या सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ केले, अशी माहिती झिंगडे यांनी दिली.
मान्सूनपूर्व पावसामुळे शाळेची कामे रखडली
शिक्षण संचालक झिंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 48 शाळांची दुरुस्ती विशेषत: नवे छप्पर टाकण्याचे काम यंदाच्या उन्हाळी सुट्टीत हाती घेतले होते. त्यातील जवळ जवळ 44 शाळांचे काम पूर्ण झाले आहे. छप्पर टाकले गेले आहे. उर्वरित चार शाळांचे छप्पर या दोन दिवसांत टाकले जाईल. यंदा मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पडल्याने छप्पर टाकण्यास अडथळा झाला. अन्यथा, सर्व कामे 30 मेपूर्वी पूर्ण होणार होती, असेही झिंगडे यांनी सांगितले.