गोवा

कला अकादमी गोव्याची शान : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

रणजित गायकवाड

पणजी, पुढारी वृत्तसेवा : कला अकादमी ही गोव्याची शान आहे. ती गोव्याची ओळख आहे. प्रत्येक कलाकाराला कला अकादमीच्या मंचावर एकदा तरी कला सादर करावी असे वाटते. अकादमीच्या सहवासात आणि सहभागात कलाकारांचा उत्साह पुन्हा द्विगुणित होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

नूतनीकरण केलेल्या कला अकादमीचे उद्घाटन शुक्रवारी 10 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सा. बां. मंत्री नीलेश काब्राल, कला संस्कृती मंत्री तथा अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे, आमदार आलेक्स रेजीनाल्ड, कला व संस्कृती खात्याचे सचिव मिनीनो डिसोझा, संचालक सगुण वेळीप, कला अकादमीचे सदस्य विनेश आर्लेकर, साबांखात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, कला अकादमीला 50 वर्षे झाल्याने तिची दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्यामुळे या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कलाकारांनी कला अकादमीवर श्रद्धा आहे. त्यामुळे कलाकारांचे श्रद्धास्थान चांगले रहावे, हीच सरकारची भावना आहे. राज्यातील अन्य जुन्या महत्त्वाच्या सरकारी इमारतींचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. आपण 2006 साली एका नाटकात कला अकादमीच्या व्यासपीठावर भूमिका केली आहे. त्यामुळे कला अकादमीबाबत कलाकारांच्या असलेल्या भावना आपल्याला माहिती असल्याचे ते म्हणाले.

एखादी नवी वास्तू बांधणे सोपे असते. मात्र, जुन्या वास्तूचा ढाचा तोच ठेऊन नूतनीकरण करणे बरेच कठीण होते. कला अकादमीच्या बाबतीतही तसेच झाल्याचे मंत्री क्राबाल यांनी सांगितले. कंत्राटदार 5 वर्षे कला अकादमीची देखरेख करणार आहे. खुल्या सभागृहाच्या रंगमंचाची बांधणी लवकरच केली जाईल, असेही काब्राल यांनी सांगितले.

मंत्री गावडे म्हणाले, कला अकादमी बंद ठेवणे बरेच कठीण होते. कारण ती कलाकारांची अस्मिता आहे. त्यामुळे तचे जतन करण्यासाठी नूतनीकरण करण्यात आले. कृष्ण कक्ष वगळता अन्य कुठेच बदल करण्यात आलेला नसल्याचेही ते म्हणाले.

यावेळी उत्तम पार्सेकर, ऑडेत सिल्वा, दयानंद नाडकर्णी, आर्टीटेक्टर मोमीन गोम्स, कंत्राटदार विक्रांत बागवे यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत सगुण वेळीप यांनी केले. निवेदन प्रा. गोविंद भगत यांनी, तर विनेश आर्लेकर यांनी आभार व्यक्त केले.

'इथे ओशाळला मृत्यू'चे सादरीकरण

कला अकादमीच्या उद्घाटनानंतर सिद्धांनंद थिएटर्स फोंडातर्फे 'इथे ओशाळला मृत्यू' हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाटक सादर करण्यात आले. या नाटकात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका मंत्री गोविंद गावडे यांनी साकारली.

कार्यक्रमासाठी नोंदणी डिसेंबरपासून

कला अकादमीतील कार्यक्रमांसाठी डिसेंबरपासून नोंदणी सुरू होणार आहे. 365 दिवसही कला अकादमी कलाकारांसाठी खुली असणार आहे. त्याचबरोबर प्रदर्शन व इतर कार्यक्रमासाठी ती खुली असेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT