मुख्यमंत्र्यांनी घेतला इडली, सांबारचा स्वाद 
गोवा

Goa : मुख्यमंत्र्यांनी घेतला इडली, सांबारचा स्वाद

माशेल-देऊळवाडा शाळेस आकस्मिक भेट, सर्वांची तारांबळ

पुढारी वृत्तसेवा

पणजी : सकाळची वेळ... सगळे आपापल्या कामात मग्न, अचानक मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येतो. सार्‍यांची तारांबळ उडते; मात्र मुख्यमंत्री शांत, संयमाने एक एक धागा उलगडत शाळेची माहिती घेतात, मुलांशी गप्पा मारतात, मुलांच्या प्रगतीपासून साधनसुविधांची नोंद करतात. बेंचवर बसून माध्यान्ह आहारात दिली जाणारी इडली, सांबार खात सर्वांना सुखद धक्का देतात. हे सारे मंगळवारी माशेलच्या देऊळवाडा येथील प्राथमिक मराठी शाळेत अनेकांना अनुभवावयास मिळाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसे नेहमीच कामात व्यग्र असतात; पण बिझी शेड्युलमधून त्यांनी अचानक माशेलच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक मराठी शाळेला भेट देऊन संपूर्ण शाळेची माहिती घेतली. शाळेच्या मुख्याध्यापक अनुजा नाईक यांनी सविस्तर माहिती पुरवली. सध्या या शाळेत फोंडा तालुक्यातील सर्वाधिक 130 मुले असून, शाळा गुणवत्तेच्या द़ृष्टीने वरचढ आहे. म्हणूनच या शाळेची ‘पंतप्रधान स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ या विशेष उपक्रमासाठी निवड झाली आहे.

भेटीदरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शाळेतील मुलांची प्रगती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षकांची संख्या, विद्यार्थ्यांना दिला जाणारा माध्यान्ह आहाराची गुणवत्तेची चौकशी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिक्षक व पालक शिक्षक संघ सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षाही जाणून घेतल्या. शाळेतील मुलांशी गप्पा मारत संवाद साधला. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीमुळे शाळा परिसरात क्षणभर गोंधळाचे वातावरण होते. नंतर मात्र मुख्यमंत्र्यांची ही भेट सर्वांसाठीच एक सुखद धक्का ठरल्याचे पालक संघाचे सागर गुरव यांनी सांगितले.

राज्यातील सर्वच शाळांचा शैक्षणिक आणि साधनसुविधात्मक दर्जा उंचावण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. यासाठी सरकारतर्फे सर्व ते प्रयत्न केले जातील. यातून राज्याचे उद्याचे भवितव्य घडत आहे याची सरकारला जाणीव आहे, म्हणूनच आम्ही शाळांच्या प्रगतीसाठी सदैव सक्रिय राहणार आहोत.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT