पणजी : मांडवी, झुआरी, कुंभारजुवेनंतर आता राज्यातील शापोरा आणि साळ या दोन्ही नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांमधून प्रवाशांसह माल वाहतूकही करता येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात नवे राष्ट्रीय जलमार्ग सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यात राज्यातील शापोरा आणि साळ या दोन नद्यांचा समावेश असल्याचे केंद्राच्या अहवालातून समोर आले आहे. रस्त्यांवरील ताण कमी करणे, किनारपट्टीवरील मालवाहतूक ६ वरून १२ टक्के वाढविणे आणि हरित लॉजिस्टिकला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पुढील पाच वर्षांत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू करण्याची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे.
देशात सध्या १११ राष्ट्रीय जलमार्ग अधिसूचित असून, ३२ सुरू आहेत. पुढील पाच वर्षांत आणखी २० जलमार्ग सुरू होणार असल्याने ही संख्या ५२ इतकी होणार असून, माल वाहतुकीसाठी केंद्राला शापोरा आणि साळ या नद्यांचीही मदत मिळणार आहे.