पणजी : पुढारी वृत्तसेवा
तब्बल १७ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि गेल्या १२ वर्षांपासून (एक तप) पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकणाऱ्या आशुतोष पंडितच्या मुसक्या अखेर सीबीआयने आवळल्या. आपली ओळख बदलून हा गुन्हेगार गोव्याच्या झगमगत्या नाईट लाईफ विश्वात यतीन शर्मा म्हणून वावरत होता.
आर्थिक फसवणूक प्रकरणातील हा नवा 'लखोबा लोखंडे' अखेर आधुनिक तंत्रज्ञानाच्या विळख्यात सापडला आणि सीबीआयने बांबोळी येथे छापा टाकून त्याला जेरबंद केले. साधारणपणे २०१३ साली पुण्याच्या हाऊस ऑफ लॅपटॉप्स या कंपनीच्या संचालकाने इंडियन ओव्हरसीज बँकेची १७ कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि नंतर तो सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र, तत्पूर्वीच आशुतोष पंडित हा मुख्य संशयित गायब झाला होता.
२०१८ मध्ये न्यायालयाने त्याला फरार गुन्हेगार म्हणून घोषित केले होते, परंतु तो नेमका कुठे आहे, याचा सुगावा कुणालाच लागत नव्हता. आशुतोषने अत्यंत हुशारीने गोव्यात आश्रय घेतला होता. बांबोळीत वास्तव्य करताना त्याने स्वतःची जुनी ओळख पूर्णपणे पुसून टाकली. त्याने केवळ नावच बदलले नाही, तर सरकारी यंत्रणेला चकवा देऊन यतीन शर्मा या नावाने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि चक्क दोन वेळा पासपोर्टही मिळवला.
या बनावट कागदपत्रांच्या जोरावर त्याने गोव्याच्या नाईटलाईफ विश्वात आपले नवे साम्राज्य उभे केले. बागा -कळंगुट या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पर्यटन पट्ट्यात हॅमर्स नावाच्या आलिशान नाईट क्लबचा तो सीईओ आणि भागीदार बनून वावरत होता. शेजाऱ्यांसाठी तो एक सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित नागरिक होता, पण त्याच्या मुखवट्यामागे एका अट्टल गुन्हेगाराचा चेहरा लपलेला होता.
'नॅटग्रिड 'मुळे प्रकार उघड...
१२ वर्षांपासून सुरू असलेला हा बनाव अखेर नॅटग्रिड या डिजिटल गुप्तचर प्रणालीमुळे संपुष्टात आला. या प्रणालीने आशुतोषच्या डेटा पॅटर्नमधील सूक्ष्म विसंगती शोधून काढल्या आणि त्याचे धागेदोरे गोव्यातील बांबोळीपर्यंत पोहोचले. सीबीआयच्या पथकाने सापळा रचून त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या खोट्या ओळखीचा बुरखा फाटला. या कारवाईमुळे गोव्यातील नाईट क्लब व्यावसायिक आणि गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.