फोंडा : राज्यातील ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाचा तपास योग्य दिशेने चालू नाही. सध्या पोलिसांवर राजकारण्यांचा दबाव असून, हे प्रकरण विशेष तपास पथक (एसआयटी) कडे द्यावे, अशी मागणी करीत गोवा यूथ काँग्रेसने म्हार्दोळ पोलिस ठाण्यासमोर शुक्रवारी निदर्शने केली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी करून त्यांच्या प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या गोवा यूथ काँग्रेसच्या प्रमुख रिकी भार्गव उपस्थित होत्या. राज्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यात कॅश फॉर जॉब प्रकरणातील 30 तक्रारी विविध पोलिस स्थानकांत नोंद झाल्या आहेत; मात्र या प्रकरणांत गुंतलेल्यांना लगेच जामीन मिळत असल्याने अशा प्रकरणांतील बड्या राजकीय नेत्यांची नावे पुढे येत नाहीत. भाजप सरकारच्या काळात गोव्यात अंदाधुंदी माजली असून, अशा प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावायचा असेल आणि अशा प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर ’एसआयटी’कडे हे प्रकरण सोपवा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक योगेश सावंत यांची भेट घेऊन या संबंधी चर्चा केली. दरम्यान, उद्या शनिवारी सकाळी पणजीच्या आझाद मैदानावर काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध सभा होणार असून गोमंतकीयांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन रिकी भार्गव यांनी केले.
एका मंत्र्याच्या कार्यालयीन कर्मचार्याला अटक केली जाते, त्यातून या प्रकरणात निश्चित काहीतरी आहे, असा आरोप युवा काँग्रेसचे महेश नाडर यांनी केला. अशा गंभीर प्रकरणांतील संशयित आरोपींना पकडल्यानंतर त्यांना सहज जामीन कसा काय मंजूर होऊ शकतो? यावरून पोलिस तपासाबाबत शंका वाटते, असे नाडर म्हणाले.
फोंडा/सासष्टी : ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात फोंडा पोलिस स्थानकाच्या कोठडीत असलेला ढवळी येथील योगेश शेणवी कुंकळ्येकर व पर्वरी येथील श्रुती प्रभुगावकर या दोघांनाही जामीन मंजूर झाला, तर मडगावातील 16.12 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी विषया गावडे व रोशन ऊर्फ सोनिया आचारी या दोन महिलांना वैयक्तिक 50 हजार रुपये व तत्सम एका हमीदाराच्या बोलीवर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी जामीन मंजूर केला आहे. संशयितांनी पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करू नये, पोलिस ज्यावेळी चौकशीसाठी बोलवतील त्यावेळी तपास अधिकार्यांसमोर उपस्थित रहावे, अशा अटी न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या आहेत. श्रुती प्रभुगावकर हिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. फोंडा पोलिसांनी या दोघांचीही कसून चौकशी केली असून दोघांकडील प्रत्येकी एक वाहन ताब्यात घेतले आहे. आपले अशिल बरेच दिवस पोलिस कोठडीत आहेत. त्या दोघी महिलांची चौकशी पूर्ण झाली आहे. तसेच आपल्या अशिलाकडून आणखी काही जाणून घेण्याचे राहिलेले नाही. या प्रकरणातील इतरांना जामीन मंजूर झालेला आहे. तेव्हा आपल्या अशिलांना न्यायालयाने जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद अर्जदारांचे वकिल अमेय प्रभुदेसाई यांनी केला होता.