Goa Road Accidents  Pudhari
गोवा

Goa Road Accidents | गोव्यात 96 टक्के रस्ते अपघात मानवी चुकीमुळे; पोलिसांच्या 31 महिन्यांच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव

Goa Road Accidents | गेल्या 31 महिन्यांत 1,383 अपघात; 719 जणांचा मृत्यू, 689 अपघात ठरले प्राणघातक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात २०२४ ते जुलै २०२६ या ३१ महिन्यांच्या कालावधीत नोंद झालेल्या १,३८३ भीषण रस्ते अपघातांपैकी तब्बल १,३२५ अपघात बेदरकार व निष्काळजी वाहन चालविल्यामुळे झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. हे प्रमाण सुमारे ९६ टक्के आहे. रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे केवळ दोन अपघात झाल्याची नोंद आहे.

या काळात ७१९ जणांना जीव गमवावा लागला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या कालावधीत झालेल्या १,३८३ अपघातांपैकी ६८९ अपघात प्राणघातक ठरले असून, त्यात ७१९ जणांचा मृत्यू झाला. उर्वरित ६९४ अपघातांमध्ये १,०२४ जण जखमी झाले.

मद्यधुंद वाहनचालकांमुळे २४ अपघात झाल्याचेही आकडेवारीत नमूद आहे. याशिवाय ५० अपघात यांत्रिक बिघाडामुळे, तर ३० अपघात अन्य कारणांमुळे झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताचे कारण निश्चित करताना पीडित किंवा तक्रारदारांचे जबाब, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि उपलब्ध असल्यास सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जातो.

गंभीर अथवा प्राणघातक अपघात झाल्यानंतर पोलिसांचे कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचे कारण निश्चित करतात. अपघातप्रवण क्षेत्रे आणि ब्लॅक स्पॉट्सगोवा पोलिसांनी २०२५ मध्ये राज्यातील २५ अपघातप्रवण क्षेत्रे आणि २५ ब्लॅक स्पॉट्स ओळखले आहेत. उत्तर गोव्यात १३ अपघातप्रवण क्षेत्रे व १५ ब्लॅक स्पॉट्स, तर दक्षिण गोव्यात १२ अपघातप्रवण क्षेत्रे आणि १० ब्लॅक स्पॉट्स निश्चित करण्यात आले आहेत.

वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी

अपघात कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कर्मचारी तैनात केले जातात. वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच नियमित विशेष मोहीम राबविल्या जात आहेत. आता सीसीटीव्ही एआय यंत्रणेची मदत घेतली जात आहे. दरम्यान, अपघातप्रवण क्षेत्रे आणि ब्लॅक स्पॉट्सची अपघातांच्या आकडेवारीचे विश्लेषण करून ओळख केली जात आहे. विविध प्रकारच्या वाहनचालकांना रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीही केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT