पेडणे : पुढारी वृत्तसेवा
न्हयबागहून पत्रादेवीच्या दिशेने जाणाऱ्या कारला उगवे येथे रविवारी सायंकाळी अपघात झाला. भरधाव वेगातील वाहन तीव्र वळणावर आले असता चालकाचा ताबा सुटल्याने ते रस्त्याबाहेर जाऊन उलटले. या अपघातात चालकासह वाहनातील सहा जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कार (केए ४९-एन-२००५) न्हयबागहून पत्रादेवीच्या दिशेने जात होती. सायंकाळी सुमारे ६.३० वाजनाच्या सुमारास उगवे येथे कार एका तीव्र वळणावर आली. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाहनाचा वेग अधिक होता. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली.
या अपघातात चालक रोशन (वय २१, रा. निपाणी, कर्नाटक) याच्यासह प्रथम चंदूरकर, प्रथमेश मन्सुले, प्रतीक गोळेकर, गुरिश अंकुशे आणि शुभम रणदिवे हे प्रवासी जखमी झाले. अपघातांनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
वाहनाचा वेग, तीव्र वळण आणि चालकाचा ताबा सुटण्याचे नेमके कारण याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
उगवे परिसरातील तीव्र वळणांवर रविवारी पुन्हा अपघात झाला. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अधिक सावधगिरीने वाहन चालविण्याची गरज या अपघातामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.