पणजी : आरजी पक्षाचे आमदार विरेेश बोरकर यांनी नगर नियोजन खात्याला त्यांच्या मतदारसंघातील नेवरा येथील प्रकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्नावर नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी नगर नियोजन कायदा कलम 39(1) अंतर्गत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर उत्तर देणे शक्य नाही, असे सांगितल्यामुळे विरेश बोरकर यांच्यासह काँग्रेस आमदार युरी आलेमाव, एल्टन डिकोस्टा, आपचे आमदार वेंझी व्हिएगस व क्रुझ सिल्वा या 5 आमदारांनी जोरदार निषेध करून सभागृहात गदारोळ केला व सभापतीं हौद्यासमोर घोषणा देत बैठक मारली.
आमदार कार्लोस फेरेरा हे सभागृहात उशिरा आले व नंतर विरोधकांत सामील झाले. मात्र, यावेळी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विरोधकांना साथ दिली नाही ते आपल्या आसनावर बसून राहिले. सभापती रमेश तवडकर यांनी विरोधकांना न्यायप्रविष्टप्रकरणी चर्चा होऊ शकत नसल्याचे सांगून जाग्यावर जावून बसण्याची विनंती केली. मात्र बसून निषेध व्यक्त करणे सुरूच ठेवल्यामुळे सभापतींनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाज दहा मिनिटांनी सुरू झाल्यानंतर विरोधक आपला हट्ट सोडायला तयार नव्हते, शेवटी सभापतींनी त्यांची समजूत काढल्यानंतर विरोधक आपापल्या जागेवर जाऊन बसले.
आमदार विरेश बोरकर म्हणाले, नगर नियोजन खाते कसलीच उत्तरे देत नाही, मात्र प्रकल्पांना परवाने दिले जात आहेत. सर्व प्रकरणे न्यायालयात असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. नगर नियोजन मंडळावर कोण कोण व्यक्ती आहेत, प्रकल्पांना मंजुरी कशी दिली जाते, असे प्रश्न आपण विचारल्याचे बोरकर यांनी सांगितले.
युरी आलेमाव म्हणाले, म्हादई प्रकरणही न्यायालयात आहे. तरीसुद्धा विधानसभेत त्यावर चर्चा झाली, मग टीसीपी खात्यावर चर्चा का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्री विश्वजित राणे, आमदार मायकल लोबो आणि नीलेश काब्राल यांच्यासोबत चर्चा केली मात्र त्यातून तोडगा निघाला नाही.