पणजी : पुढारी वृत्तसेवा
कांदोळी येथील रहिवाशांनी सिकेरीमध्ये एका राजकीय नेत्याकडून कथित मोठ्या रिअल इस्टेट प्रकल्पांना आणि एका बॉलीवूड अभिनेत्याशी संबंधित मालमत्तेला प्रवेश सुलभ करण्यासाठी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध केला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह संबंधित सरकारी खात्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.
या रस्त्यासाठी जमीन संपादनाची कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक वैधानिक मंजुरी न घेता हे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याचा आरोप १८ जुलै रोजी सादर केलेल्या तक्रारीत ग्लेन फर्नांडिस आणि डेरिक गोन्साल्व्हिस यांनी दावा केला आहे. या प्रकल्पासाठी कोणतीही जमीन संपादन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.
तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि जमीनमालकांवर त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा काही भाग कोणत्याही मोबदल्याशिवाय देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजकीय नेता स्वतः रस्ता रुंदीकरणाच्या कामावर देखरेख करत असल्याचे दिसून येते.
रस्ते आणि गटारे यांसारखी सार्वजनिक पायाभूत कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण आणि इतर नियोजन संस्थांच्या आवश्यक मंजुरीशिवाय केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून काम थांबवावे, चौकशी करावी आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्ता अरुंद असल्यामुळे किनारपट्टीवरील अनियंत्रित काँक्रीटीकरणाला नैसर्गिक अडथळा निर्माण होत असल्याचा दावा करत, काही स्वार्थी घटक स्वतःच्या फायद्यासाठी या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.