काणकोण : पुढारी वृत्तसेवा
श्रीस्थळ ग्रामपंचायत क्षेत्रातील असलेली रस्त्यांच्या कडेला अनावश्यक झाडे-झुडपे कापण्याची आणि फांद्या छाटण्याचे काम पंचायत सदस्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून हाती घेतले आहे. माजी पंचसदस्य संजू नाईक तसेच विद्यमान सदस्य लिव्हिया नाईक आणि रामू नाईक यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वीची खबरदारी म्हणून आणि स्थानिक रहिवाशांच्या तोंडी तक्रारींची दखल घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.
झाडांच्या फांद्या पडल्यामुळे होणारे अपघात आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची छाटणी करणे आवश्यक होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अडथळा आणणारी वाढलेली झुडपे काढण्यासाठी काणकोण वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडूनही अनेकदा अशा प्रकारे झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम केले जाते. परंतु, वारंवार विनंत्या करूनही काणकोणचे उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांनी धोकादायक झाडे तोडण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही
करमल घाटात धोका कायम
गेल्या दहा दिवसांत काणकोण नगरपालिका आणि आसपासच्या परिसरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. पावसाचा जोर वाढत असताना काणकोण येथील करमल घाट परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांबाबत सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
योग्यवेळी खबरदारी आवश्यक
मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जुनी झाडे कमकुवत होतात आणि काही वेळा पाऊस किंवा वारा नसतानाही ती कोसळतात. त्यामुळेच पावसाळ्यापूर्वी अशी खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे, असे मत श्रीस्थळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सेजल गावकर आणि उपसरपंच शिवराज देशमुख यांनी व्यक्त केले.