चावडी : संजय कोमरपंत
काणकोणातील बाबुसोदाद व इतरांची दुकाने असलेली जुनी जीर्ण धोकादायक इमारत काणकोण पालिकेने सोमवारी जमीनदोस्त केली. या जमीनदोस्त केलेल्या इमारतीबरोबरच या ज्या इमारतीत असलेल्या कॅफे सेंट्रल हॉटेलात जे काणकोणचे नेते घडले आहेत ते हॉटेल आज जमीनदोस्त होण्याबरोबरच बाबुसोदाद व काणकोणच्या राजकीय व सामाजिक आंदोलनाच्या इतिहासाच्या खुणाही जमीनदोस्त झाल्या असून आता केवळ आठवणी उरल्या आहेत.
चावडी काणकोण जुन्या बसस्थानकाजवळ नगर्से येथील बाबुसो नाईक 'कॅफे सेंट्रल' नावाच्या हॉटेलमधून काणकोणमधील व काणकोणबाहेरुन येणाऱ्या लोकांना चहा फराळ द्यायचे. चाररस्ता येथील कामतीच्या हॉटेलमध्ये मिक्स भाजी, भास्कराच्या हॉटेलमधील शिरा तर बाबुसो दादाच्या हॉटेलमधील फेणोरी व चिरुटी हे जिन्नस प्रसिद्ध होते. बाबुसो दादाचे कॅफे सेंट्रल फक्त चहा फराळाचेच हॉटेल नव्हते तर त्यावेळच्या म.गो. पक्षाच्या कार्यकर्त्याचे बसण्याचे ठिकाण सुद्धा होते.
बाबुसो दादाच्या हॉटेलच्या बाहेर दोन बांकड़े हे राजकीय चर्चा व काणकोणमधील विविध प्रश्नावर चर्चा करण्याकरीता ते एक उत्तम ठिकाण होते. त्याच करीता ते बाकड़े ठेवले होते. याच पांढरा शुभ्र शर्ट, काळी पेंट घालून बाबुसो दाद गल्ल्यावर बसायचे व तेथून आपल्या हॉटेलमधील १०-१५ वेटरकडून हॉटेलात येणाऱ्यांना सेवा द्यायचे. बाबुसोदादाच्या हॉटेलमध्ये गोव्यातील वर्तमानपत्रांसह व मुंबईची वर्तमानपत्रे सुद्धा मिळायची. उमाकांत दलालाच्या व बाबुसोदादाच्या दुकानावरच लोकाना स्थानिक व देश, विदेशातील माहिती फक्त वर्तमानपत्रांतून समजायची.