पणजी : गोवा सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि.24 ते 26 मार्च या कालावधीत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने दि. 26 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
राज्यातील विविध संस्था, उद्योग संघटना यांच्याकडून अर्थसंकल्पासंदर्भात सूचना स्वीकारल्यानंतर आता सरकारच्या विविध खात्यांच्या अधिकार्यांच्या बैठका घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केली असून, मागील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात या बैठका घेतल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस, आम आदमी पक्ष व गोवा फॉरवर्ड या पक्षाचे एकूण सहा आमदार सरकारला विधानसभेत घेरण्यासाठी नियोजन करत आहेत. शुक्रवारी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या कक्षात या सहा आमदारांची बैठक झाली. सरकारला कोणत्या प्रश्नावर घेरायचे, यावर या बैठकीत चर्चा झाली. विरोधात असलेल्या आरजी पक्षाचे एकमेव आमदार विरेेश बोरकर यांनी विरोधकांना साथ दिलेली नाही; मात्र ते स्वतः सरकारवर विविध विषयांवर तुटून पडण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात सोमवार आणि मंगळवार असे दोन पूर्ण दिवस कामकाज होण्याची शक्यता आहे, त्यानंतर बुधवारी सकाळच्या सत्रात कामकाज झाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. सरकारकडे 40 पैकी 33 आमदारांचे पाठबळ असल्यामुळे विरोधकांच्या हल्ल्यांना सरकार समर्थपणे तोंड देण्यास सज्ज झाले आहे. विरोधकांनी कितीही आरडाओरड केला तरी सरकार जास्त चलबिचल होत नाही. यापूर्वीच्या अधिवेशनात हे दिसून आलेले आहे.