पणजी : राज्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असलेले बोंडला प्राणिसंग्रहालय नव्याने सुरू केल्यानंतर आता पूर्ण क्षमतेने स्थानिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्याला स्थानिक आणि पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. विविध प्रकारच्या प्राण्यांचे पुनर्वसन, देखभाल व संरक्षक उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यानंतर संग्रहालय पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
वनमंत्री राणे म्हणाले, मार्च महिन्यात काही प्राण्यांना विषाणू संसर्ग झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून हे प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात आले होते. आता ते सुरू करण्यात आले आहे. बोंडला हे केवळ पर्यटनस्थळ नसून, जैवविविधतेचे संवर्धन आणि जनजागृतीचे केंद्र आहे. येत्या काळात या प्राणिसंग्रहालयात नवनवीन सुविधा व प्रजातींचा समावेश केला जाईल. इथे येणार्या पर्यटकांचा अनुभव समृद्ध करण्यावर आमचा भर आहे. सध्या बिबट्या, सांबर, चितळ, हरण, कोल्हे, माकडे, अस्वले यांच्यासह मगर, सुसर, विविध प्रकारचे साप, विविध जातींचे देशी-परदेशी पक्ष्यांचे दर्शन येथे होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे प्राण्यांसाठी सुधारित व नैसर्गिक अधिवासानुसार तयार केलेली पिंजरे होय. लहान मुलांसह पर्यटकांना शैक्षणिक माहितीची सोय येथे करण्यात आली आहे.
लवकरच नवीन प्रजातींचा समावेश करण्यात येणार असून यात अस्वले, गेंडे, हरणे, काही परदेशी पक्षी यांचा समावेश आहे. याबरोबर प्राणी उपचार केंद्राचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. शैक्षणिक व पर्यावरण साक्षरता कार्यशाळा असेल. बोंडला परिसरात इको-टुरिझम प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचेही मंत्री राणे म्हणाले.