बी. एल. संतोष गोव्यात; दामू नाईक यांच्याशी चर्चा Pudhari File Photo
गोवा

Goa Election 2027 | गोव्यात भाजप 'मिशन 2027' साठी सज्ज! राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा

Goa Election 2027 | मंत्री, आमदारांशी स्वतंत्र चर्चा : नव्या मुख्यालयाच्या कामाची केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी रविवारी गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक, विविध विकासकामे, संघटनात्मक तयारी आणि कदंब पठारावरील नव्या भाजप मुख्यालयाच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी काही मंत्री व आमदारांशी स्वतंत्र चर्चा केली. नवीन भाजप मुख्यालयाचे सुमारे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून आवश्यक सुविधा व उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या मुख्यालयाचे उद्घाटन १५ ऑगस्टच्या सुमारास होण्याची शक्यता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक बळकट करणे आणि पुढील सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने संतोष यांच्याशी चर्चा झाली.

बैठकीत कोणाबाबतही तक्रार करण्यात आली नसून चर्चा केवळ निवडणुकीच्या तयारीवर केंद्रित होती. पक्षाच्या विजयासाठी शंभर टक्के कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नीलेश काब्राल यांनी आपल्या मतदारसंघात कोणालाही समाजकार्य करण्यास हरकत नसल्याचे सांगितले.

आपण तळागाळात काम करून जनतेशी जोडले गेलो असून भाजपचे तिकीट कोणाला द्यायचे याचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वच घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी बी. एल. संतोष यांच्याशी झालेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. मंत्री झाल्यानंतरची ही पहिली भेट असून पर्वरी आणि दाबोळी उड्डाणपूल प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती त्यांनी विचारल्याचे सांगितले. याशिवाय आमदार गणेश गावकर आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही त्यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजप मुख्यालयात तीन कार्यक्रम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, भाजप राज्य मुख्यालयात 'मन की बात', डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'बलिदान दिवस' तसेच कार्यकर्त्यांसाठी 'डिजिटल प्रशिक्षण' कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 'मन की बात'मुळे सरकार आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ होत असून डिजिटल प्रशिक्षणामुळे तंत्रज्ञान सज्ज पक्ष संघटना उभारण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT