Vijay Sardesai  Pudhari photo
गोवा

Fatorda Bridge Dispute Goa | भाजप प्रदेशाध्यक्षांनी सरकारी कामे बंद पाडली; आमदार विजय सरदेसाईंचा गंभीर आरोप

Fatorda Bridge Dispute Goa | भाजप प्रदेशाध्यक्षांनी साकवासह इतर सरकारी मंजूर कामे बंद पाडल्याचा आमदार विजय सरदेसाई यांचा गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फातोर्डा मतदारसंघातील साकवाचेच नव्हे तर इतर सरकारी मंजुरी मिळालेली कामेही संबंधित मंत्र्यांना सांगून बंद पाडल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

गोवा विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी राज्यातील राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला असून वातावरण तापू लागले आहे.फातोर्ड्यात साकव दुरुस्तीवरून गोवा फॉरवर्डचे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई व भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

केवळ साकवच नव्हे, तर फातोर्ड्यातील सरकारी मंजुरी मिळालेली अनेक विकासकामेही बंद पाडण्यात आली असून, 'पीपलस् पथ'चे कामही बंद पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असे सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आगाळी-फातोर्डा येथील ३५ वर्षांपूर्वीच्या साकवाच्या (लहान पूल) दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता.

आता हे सुरू झालेले काम प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या सांगण्यावरूनच सार्वजनिक बांधकाम खात्याने बंद पाडल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे. या साकवाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फतच सुरू करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यामार्फत ही फाइल मंजूर करण्यात आली होती.

निविदा जाहीर करून ठेकेदाराला कामाचा आदेशही देण्यात आला होता आणि प्रत्यक्षात कामही सुरू झाले होते. मात्र, एकदा सुरू झालेले विकासकाम अशा प्रकारे राजकीय दबावाखाली बंद पाडणे हे कसले प्रशासन, असा संतप्त सवाल विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT