पणजी : मांद्रे, प्रियोळ, फोंडा, शिरोडा या मतदारसंघांत भाजपचे आमदार असताना मगो पक्षाने तेथे निवडणूक तयारी सुरू केल्यामुळे भाजप व मगोतील युतीत तणाव वाढला आहे. त्याबाबतच्या तक्रारी स्थानिक भाजप नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे केल्यानंतर मगो पक्षाने भाजप आमदारांच्या मतदारसंघांत ढवळाढवळ करू नये, असा थेट इशारा दामू नाईक यांनी मगोला दिला. त्यामुळे वरील मतदारसंघांवरून भाजप व मगो युती संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी दामू नाईक यांनी सांगितले की, भाजप व मगो पक्ष यांची युती आहे. भाजपला पूर्ण बहुमत असतानाही समविचारी पक्ष असल्यामुळे मगो सोबत भाजपने युती केली आणि त्यांना सरकारमध्येही सामावून घेतले. मात्र, निवडणुका जवळ येत असताना जेथे भाजपचे आमदार आहेत, तेथे मगो पक्षाने ढवळाढवळ करण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी तेथील स्थानिक भाजप नेते करत आहेत. मगोने भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांत ढवळाढवळ न करता जेथे भाजपचे आमदार नाहीत तेथे अवश्य तयारी करावी, असा सबुरीचा सल्ला इशारा दामू नाईक यांनी मगो पक्षाच्या नेत्यांना दिला आहे.
पेडणे, प्रियोळ, शिरोडा व फोंडा येथे भाजपचे उमेदवार असताना तेथे मगो पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी करताना सभा घेण्यास सुरुवात केली आहे. काही जागी कार्यालयेही स्थापन केली आहेत.
ब्लॅकमेलिंग चालणार नाही
माजी उपमुख्यमंत्री व पेडण्याचे माजी आमदार बाबू आजगावकर यांनी आपण भाजपात आहे. भाजपने आपणाला पेडणेची उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून लढू, असा इशारा दिला होता. त्याबाबत दामू नाईक यांना विचारले असता, भाजप हा मोठा पक्ष आहे. इथे कोणाची मक्तेदारी चालत नाही, सगळेच नेते हे कार्यकर्ते असतात. पक्ष कोणाचीही ब्लॅकमेलिंग किंवा दडपण सहन करणार नाही. मी स्वतः पक्षाचा अध्यक्ष आहे, तरी माझ्या उमेदवारीचा दावा आपण करू शकत नाही. भाजप जो काही निर्णय घेतो तो देशाच्या, राज्याच्या आणि पक्षाच्या हिताचा असतो. नेत्यांच्या वैयक्तिक हिताचा नसतो, असेही नाईक म्हणाले.
आर्लेकरांवर टीका आणि दामूंकडे तक्रारी
दोन दिवसांपूर्वी मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पेडणे मतदारसंघात जाऊन तेथे मगोचा उमेदवार जिंकणार असल्याचा दावा करून भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे तेथील पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दामू नाईक यांची भेट घेऊन मगोच्या कामावर आक्षेप घेत मगो युतीचा धर्म पाळत नसल्याच्या तक्रारी केल्या व भाजपच्या मतदारसंघात ढवळाढवळ करण्यास मगोवर बंदी घालावी, अशी मागणी केली.
..तर ते भाजप मान्य करणार नाही: दामू
माध्यमांशी बोलताना दामू नाईक म्हणाले की, मगो पक्ष सत्तेत असल्यामुळे त्यांनी युती धर्म पाळावा, आम्हीही तो पाळू. जेथे भाजपचे आमदार नाहीत तेथे त्यांनी अवश्य आपला पक्ष वाढवावा. मात्र भाजप आमदार असलेल्या जागांवर दावेदारी करणे भाजप मान्य करणार नाही, असे नाईक म्हणाले.