Goa BJP MGP Alliance Pudhari
गोवा

BJP MGP Alliance: गोव्यात भाजप-मगो युतीचे संकेत; या दोन मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे राज्याचं लक्ष

Goa Election 2027 | दोन्ही मतदारसंघात इच्छुक वाढले; जागावाटप, उमेदवारीच्या गणिताकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Goa Bjp Maharashtrawadi Gomantak Party Alliance News

पेडणे : निवृत्ती शिरोडकर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात पुन्हा युती होणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. युती झाल्यास पेडणे आणि मांद्रे या दोन्ही मतदारसंघांतील जागावाटपाचे सूत्र काय असेल, याकडे कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष लागले असून मांद्रे भाजपकडे, तर पेडणे मगोकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून मगोच्या उमेदवार म्हणून तारा हडफडकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर पक्षाचे सिंह चिन्ह असलेले फलक पुन्हा झळकू लागले. पेडणे मतदारसंघात मात्र मगोची उपस्थिती तुलनेने कमी जाणवत होती, कारण तो मतदारसंघ भाजपकडे आहे.
आता विधानसभा निवडणूक जवळ येत असताना मगोचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. मगो-भाजप युती झाली तर पेडणे आणि मांद्रे यापैकी कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहेत.

विद्यमान आमदारांच्या राजकीय स्थितीमुळे या जागावाटपाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मांद्रेचे विद्यमान आमदार जीत आरोलकर हे मगोचे, तर पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र, भाजप-मगो युती किंवा जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

मांद्रेतून पार्सेकर, सोपटे यांची नावे चर्चेत

मांद्रे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे यांची नावेही चर्चेत आहेत. दोन्ही नेत्यांनी पक्षाचा निर्णय मान्य करून एकत्र काम करण्याची भूमिका घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे मांद्रे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास उमेदवारीचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

मांद्रेतून आरोलकर भाजपतर्फे लढणार?

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची कुजबुज सुरू आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास आणि भाजप-मगो युती झाल्यास मांद्रे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्या बदल्यात पेडणे मतदारसंघ मगोला सोडला जाऊ शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मात्र, या चर्चेला भाजप किंवा मगो यांच्याकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पेडणेत आर्लेकरांसह अनेक इच्छुक...

पेडणे मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. मिशन फॉर लोकलचे नेते राजन कोरगावकर हे मगोच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक म्हणून चर्चेत आहेत. अलीकडेच मगोचे ज्येष्ठ नेते दीपक ढवळीकर आणि राजन कोरगावकर यांच्या उपस्थितीत पेडणे मतदारसंघात झालेल्या सभेमुळे मगो या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आणखी वाढली आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी डॉ. संजय कोरगावकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, डॉ. उदय कुडतरकर, उत्तम पार्सेकर आणि विलास तांबोसकर यांचीही नावे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. त्यामुळे युती झाली तर पेडणे मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT