BJP  Pudhari
गोवा

Goa BJP Internal Survey | उत्तरेतील 30 टक्के विद्यमान आमदारांवर टांगती तलवार

Goa BJP Internal Survey | निवडणुकीसाठी भाजपचे अंतर्गत सर्वेक्षण; नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी करत असलेल्या भारतीय जनता पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात उत्तर गोव्यातील भाजपच्या ३० टक्के आमदारांच्या मतदारसंघात ते आमदार असुरक्षीत म्हणून नोंद झाले आहेत. त्यामुळे या विद्यमान आमदारांवर टांगती तलवार असून असुरक्षीत आमदारांच्या जागी नवे उमेदवार देण्यासाठी भाजपने उमेदवार चाचपणी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर - किंवा फेब्रुवारी मध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना भाजपने उत्तर गोव्यातील सर्व २० मतदारसंघात अंतर्गत सर्वे केला. ज्यात भाजपच्या १७ आमदारांपैकी ५ ते ६ आमदार पुढील निवडणुकीसाठी असुरक्षीत असल्याचे दिसून आले आहेत.

यात काही आमदारांची कामगिरी असमाधानकारक असून काहींचा तळागाळातील लोकांशी असलेला संपर्क तुटल्याचे सर्वेक्षणात नोंद झाले आहे. भाजपच्या २८ पैकी उत्तर गोव्यात भाजपकडे १७ आमदार आहेत. २० पैकी हळदोणा येथे काँग्रेस, डिचोलीत अपक्ष, तर सांत आंद्रे आरजी पक्षाकडे आहेत. भाजपने राज्यात केलेले सर्वेक्षण हे 'अ', 'ब' व 'क' अशा तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करुन केले आहे.

सत्तरी आणि डिचोली तालुक्यांमधील तसेच बार्देश आणि तिसवाडीमधील काही मतदारसंघ जिथे विजयाची खात्री आहे, अशा मतदारसंघांना 'अ' श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पेडणे, तिसवाडी व बार्देश तालुक्यांतील काही मतदारसंघात जिंकण्याची शक्यता ५० टक्के आहे, त्यांना 'ब' श्रेणीत ठेवण्यात आले आहे,

तर ज्या ठिकाणी पक्षाला आपला उमेदवार बदलण्याची गरज वाटते किंवा जिथे लोकांत आमदाराबद्दल चांगले मत नाही अशा जागांना 'क' श्रेणीत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती भाजप गाभा समितीच्या एका वरिष्ठ सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

रणनीती, निवडणुकीपूर्वी नियोजन, संपर्क मोहीम आणि उमेदवारांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी नुकतीच गाभा समितीची बैठक झाली होती. बैठकीच्या पहिल्या फेरीत उत्तर गोव्यातील मतदारसंघांचा समावेश करण्यात आला होता. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे आणि इतर सदस्य उपस्थित होते.

दक्षिणेत 17 जागांचे सर्वेक्षण सुरू...

दक्षिण गोव्यातील 20 विधानसभा मतदारसंघ असले तरी वेळ्ळी, नुवे आणि बाणावली या मतदारसंघात भाजप फारच कमजोर असल्याने हे मतदारंसघ वगळून इतर 17 जागांच्या सर्वेक्षणावर पक्षाने भर दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT