पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात एसटी आरक्षणाची प्रक्रिया २०१३ मध्ये काँग्रेसने सुरू करूनही भाजपने १२ वर्षे विलंब करत फसवणूक केली. भाजपचा बहुजन समाजाला त्यांचा घटनात्मक हक्क आणि अधिकार देण्याचा हेतू कधीच स्पष्ट नव्हता. भाजप बहुजन समाजाला केवळ राजकीय सोयीसाठी वापरत आहे. दुसरीकडे एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता नाही.
या विषयावरील त्यांचा हेतू संशयास्पद आणि अस्पष्ट असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. चोडणकर म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात २०१३ मध्ये संसदेतून गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याच्या कायदेशीर प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली होती.
त्यानंतर देशातील इतर अनेक राज्यांमध्ये अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षणाची अंमलबजावणी यशस्वीरीत्या झाली; परंतु गोवा हे देशातील एकमेव असे राज्य आहे जिथे ही प्रक्रिया अद्यापही प्रलंबित राहिली आहे.
या प्रदीर्घ विलंबाची संपूर्ण जबाबदारी भाजप सरकारचीच आहे. केंद्रात २०१४ पासून तर गोव्यात २०१२ पासून भाजपची सत्ता आहे. काँग्रेसच्या काळात आरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली होती.
केवळ औपचारिक अधिसूचना प्रसिद्ध करणे हे अवघ्या दोन मिनिटांचे काम असताना, भाजपने या प्रक्रियेत तब्बल १२ वर्षे घालवून बहुजन आणि एसटी समाजाची घोर फसवणूक केली आहे.
चोडणकर म्हणाले की, एकीकडे काँग्रेस नेते समाजाच्या हितासाठी त्याग करण्यास तयार असताना, दुसरीकडे सांताक्रुझसह अनेक मतदारसंघांमध्ये भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आणि सत्तासंघर्ष उफाळून आला असल्याची टीका त्यांनी केली.
कारापूर-सर्वण येथील मेगा प्रकल्पाच्या विरोधामुळे "हाउस ऑफ अभिनंदन लोढा" यांच्याकडून पत्र पाठवून कायद्याची भीती दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री आणि नगर नियोजन मंत्र्यांच्या दबावाखाली हे षड्यंत्र रचले जात आहे. मोपा विमानतळावर पार्क केलेले १३० कोटींचे प्रायव्हेट जेट नेमके कोणाचे, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असेही चोडणकर म्हणाले.