पणजी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि नावाला विरोधक असलेल्या काँग्रेसची छुपी युती पुन्हा उघड झाली आहे. आपच्या मते कळंगुट जिल्हा पंचायत मतदारसंघ हे याचे सर्वात स्पष्ट उदाहरण असल्याचा आरोप आपचे संघटन सचिव श्रीकृष्ण परब यांनी केला.
आपच्या कळंगुट जि. पं. उमेदवार कॅरल फर्नांडिस यांच्यासह आप पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. परब म्हणाले, भाजपने पूर्वी कर्मेलिना फर्नांडिस यांना पक्षातून काढले होते. मात्र आता काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. या कर्मेलिना यांनी भाजपचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्यासाठी सक्रिय प्रचार केला होता.
आता त्या काँग्रेसच्या तिकिटावर लढत असल्याने कळंगुटमध्ये प्रत्यक्षात भाजपचेच दोन उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसला मत दिले तरी ते शेवटी भाजपलाच जाणार आहे, असल्याचेही ते म्हणाले. कळंगुट उमेदवार कॅरल फर्नांडिस म्हणाल्या की, कळंगुटमध्ये भाजपचा खरा विरोधक फक्त आप आहे. कर्मेलिना फर्नांडिस यांना काँग्रेसची उमेदवार समजून मत दिले, तर ते मत भाजपलाच जाणार आहे.