पणजी : राज्यात प्रशासकीय पातळीवर मोठे बदल करण्यात आले असून, आयएएस आणि आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांची नवी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये दोन वरिष्ठ आयएएस अधिकार्यांची गोव्यात नियुक्ती झाली असून, काही अधिकार्यांची गोव्यातून अरुणाचल प्रदेश आणि दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी यतिंद्र मराळकर यांची लडाखमधून आणि संजीव गडकर यांची जम्मू काश्मीरमधून गोव्यात बदली झाली आहे. ते लवकरच आपला पदभार स्वीकारणार आहेत. दुसरीकडे, आयएएस अधिकारी यशस्वीनी बी., अश्विन चंद्रू आणि स्नेहा गीत्ते यांची बदली गोव्यातून अरुणाचल प्रदेशात झाली आहे.
लईराई जत्रोत्सव दुर्घटनाप्रकरणी स्नेहा गीत्ते यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यांच्या जागी यशस्वीनी बी. यांना आणण्यात आले होते. आयएएस रमेश वर्मा, अरुण कुमार मिश्रा आणि सुनील अंचिपका यांची बदली दिल्लीला झाली आहे. आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांमध्ये ओमवीर सिंग बिश्नोई यांची बदली दिल्लीला करण्यात आली असून, केशव राम चौरासीया यांची गोव्यात नियुक्ती झाली आहे. या बदल्यांमुळे गोव्याच्या प्रशासकीय यंत्रणेत नवे चेहरे कार्यरत होणार आहेत.