Goa Farm News  
गोवा

Goa Farm News | लाडफे-डिचोलीतील महिलांची गरुडझेप! 1220 चौरस मीटर जागेत फुलवला पिवळाधमक झेंडूचा मळा

Goa Farm News | लाडफे डिचोलीत महिलांनी १२२० चौरस मीटर जागेत फुलवली झेंडूची बाग

पुढारी वृत्तसेवा

डिचोली : पुढारी वृत्तसेवा

लाडफे डिचोली येथील सातेरी केळबाई स्वयंसहाय्य गटातील महिलांनी आपल्या गावात सुमारे १२२० चौरस मीटर जागेत झेंडूच्या फुलांची बाग फुलवली आहे. आरडीएच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या झेंडूच्या बियांचा वापर करून महिलांनी हा झेंडूचा मळा फुलविला आहे.

सातेरी केळबाई स्वयंसहाय्य गटाच्या प्रज्ञा परब आणि विशाखा मळीक यांनी झेंडूच्या फुलांची लागवड करण्याचे ठरविले. मात्र, त्यांच्यासमोर सर्वप्रथम जागेची समस्या निर्माण झाली. आरडीएच्या माध्यमातून त्यांना झेंडूच्या सुमारे १४०० बिया मिळाल्या होत्या. मात्र, या बियांची लागवड कुठे करायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.
त्यावेळी गावातील सखाराम मळीक आणि सत्यवान मळीक यांनी आपल्या सुमारे १२२० चौरस मीटर जागेत या बियांची लागवड करण्यासाठी महिलांना परवानगी दिली. एवढेच नव्हे, तर झेंडूचा मळा तयार करण्यासाठीही या दोघांनी सातेरी केळबाई स्वयंसहाय्य गटाला सहकार्य केले.

जुलै महिन्याच्या अखेरीस या बियांची रोपे तयार करण्यात आली. त्यानंतर सुमारे महिन्याने, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झेंडूच्या झाडांना फुले येण्यास सुरुवात झाली. जवळच चतुर्थीचा सण असल्याने महिलांनी या कालावधीत सुमारे ३० किलो झेंडूची फुले डिचोलीतील विविध ठिकाणी विकली.

पहिलाच हंगाम असल्याने त्यांनी ही फुले ६० रुपये प्रतिकिलो दराने विकली.
झेंडूची फुले झाडावर जास्तीत जास्त चार ते पाच दिवस टिकतात. त्यानंतर ती कोमेजून पडत असल्याने वेळेत फुले तोडून त्यांची विक्री करावी लागते, अशी माहिती विशाखा मळीक यांनी दिली.

नवरात्रोत्सवाच्या काळात गोव्यात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. सध्या राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले आणावी लागतात आणि त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. यंदा या महिला स्वयंसहाय्य गटाच्या झेंडूच्या फुलांनाही नवरात्रोत्सवात मोठी मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.

...तर बाहेरून फुले मागविण्याची गरज नाही:

सरकारने झेंडूच्या फुलांच्या लागवडीसाठी योग्य नियोजन, मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिल्यास गोव्यातील इतर महिला मंडळे व स्वयंसहाय्य गटही अशा प्रकारे झेंडूच्या फुलांच्या व्यवसायाकडे वळतील. भविष्यात नवरात्रोत्सव किंवा दसऱ्याच्या काळात गोव्याला राज्याबाहेरून झेंडूची फुले मागवण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास या महिलांनी व्यक्त केला.

आमदार शेट्ये यांच्याकडून कौतुक:

या महिलांच्या उपक्रमाची दखल डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही घेतली. त्यांनी स्वतः झेंडूच्या मळ्याला भेट देऊन महिलांचे कौतुक केले. तसेच या उपक्रमासाठी आपले सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी स्वयंसहाय्य गटाच्या महिलांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT