भोस्ते मानवी सांगाडा प्रकरण. Pudhari File Photo
गोवा

भोस्ते मानवी सांगाडा प्रकरण : योगेश पोलिसांना देतोय कायद्याच्या भाषेत उत्तरे

पुढारी वृत्तसेवा
पणजी : पुढारी वृत्तसेवा

भोस्ते घाटातील जंगलात सापडलेला मानवी सांगाडा आणि त्याची माहिती देणारा योगेश पिंपळ आर्या (30, मूळ रा. सावंतवाडी आजगाव, सध्या रा. आल्त बेती) याच्या बाबतीत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. योगेश हा इंटरनेटवरून सातत्याने कायदेविषयक माहिती जाणून घेत असल्याची माहिती तो पिळर्ण येथे पूर्वी काम करीत असलेल्या एका अस्थापनातील कर्मचार्‍याने दिली. त्यामुळे तो कायद्याच्या भाषेत माहिती देत असल्याचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी सांगितले. दरम्यान, मृतदेहाचाही तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गालगत भोस्ते घाटातील जंगलात अनोळखी मृतदेहाची माहिती पोलिसांना देणारा योगेश हा उच्चशिक्षित आहे. त्याला नवनवीन माहिती मिळविण्याची सवय आहे. काही वर्षांपूर्वी तो पिळर्ण येथील एका अस्थापनात कामाला होता. फावल्या वेळात तसेच काम संपल्यानंतर तासनतास इंटरनेटवरून कायदेविषयक माहिती जमा करीत होता. ही माहिती तो एका वहीत टिपून ठेवायचा. सदर आस्थापनातील एका कर्मचार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, योगेश हा नेहमी इंटरनेटवर विविध कायद्यांची माहिती घेत होता. त्यासाठी तो काम संपल्यानंतर किंवा अनेकदा आठवडा सुट्टी दिवशी तो आस्थापनात येऊन तो इंटरनेटवर कायद्यांची सखोल माहिती घ्यायचा. त्यासाठी तो तासनतास वेळ बसायचा. त्यामुळे तो कायद्याचा अभ्यास नेमका कशासाठी करायचा, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

योगेश हा आपल्याच विश्वात रमणारा आहे. पहाटे उठून तो बाहेर पडायचा. एवढ्या पहाटे कोठे जातोस, असे विचारल्यावर आपल्याला पहाटे व्हिडिओ काढायला आवडतात. तसेच पहाटेचे वातावरणही प्रसन्न असते, असे तो सांगायचा. रात्री कितीही वाजता आली तरी तो डायरी लिहूनच झोपायचा, अशी माहिती तो सध्या वास्तव्यास असलेल्या आल्त बेती, पर्वरी येथील खोलीत राहणार्‍या त्याच्या सहकार्‍यांनी दिली.

योगेशचे वर्तन आक्षेपार्ह नव्हते...

योगेश हा मूळ सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील आहे. गेली अनेक वर्षे तो गोव्यात कामानिमित्त राहत आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यासोबत त्याचे वर्तन आक्षेपार्ह नव्हते, असे आल्त बेती येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT