सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
'बंगळूर- मंगळुरू- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे भारताची आयटी राजधानी आणि पर्यटन राजधानीला जोडणार आहे, तसेच आंतरराज्य व्यापारालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १३) बंगळूरच्या रेल्वे स्थानकावर या रेल्वेचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मडगावच्या रेल्वे स्थानकावर बंगळूर - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेच्या उद्घाटनाचा एक भाग म्हणून (दि.१३) दुपारी १.३० वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कोकण रेल्वे महामंडळाने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, कोकण रेल्वे महामंडळाचे संचालक सुनील गुप्ता, उपसरव्यवस्थापक बबन घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, १५ नोव्हेंबरपासून या गाडीची नियमित सेवा सुरू होईल, जी सध्याच्या मंगळुरू-मडगाव सेवेची जागा घेईल. ही रेल्वे हसन, सकलेशपूर, मंगळुरू, उडुपी, मुरुडेश्वर, गोकर्ण आणि कारवारमार्गे ८५० किमीचे अंतर १३ तासांत पूर्ण करेल.
या सेवेचा फायदा बंगळूरमध्ये काम करणाऱ्या गोव्यातील आयटी व्यावसायिकांना, पर्यटकांना आणि किनारपट्टीवरील कर्नाटकच्या रहिवाशांना होईल. आंतरराज्य व्यापारालाही चालना मिळेल. त्यांनी आठवण करून दिली की, २०२३ मध्येच त्यांनी बंगळूर आणि पुण्यापर्यंत वंदे भारत सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
गोव्यातील बहुतेक लोक, विद्यार्थी शिक्षण क्षेत्र किंवा नोकरीसाठी मुंबई, पुणे शहरात जात होते. परंतु बंगळूर हे शहर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विकसित झाल्यानंतर गोव्याचे बरेच लोक बेंगळूर शहराकडे आकर्षित होताना दिसतात. बंगळूर-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे.
भविष्यात कारवार, मडगाव ते सिंधुदुर्ग
भविष्यात ही एक्स्प्रेस रेल्वे गाडी देवदर्शनाच्या ठिकाणांना जोडली जाणार आहे. तरी आपले सरकार कारवार, मडगाव ते सिंधुदुर्गपर्यंत अशाच प्रकारे विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.