पणजी : पुढारी वृत्तसेवा
बार्देश तालुक्यात दोन महिलांचे मृतदेह आढळले. त्यातील एकीची ओळख पटलेली नाही. तिने पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. थिवी माडेल येथील नदीत एका स्थानिक मच्छीमाराला एक मृतदेह तरंगताना दिसला. त्याने पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रात शोध घेतला.
संबंधित महिलेने चप्पल नदीकाठावर काढून ठेवली होती. अखेर त्या ठिकाणापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह आढळला. बिबिजान उदकेरी (वय ७०) असे त्यांचे नाव असून त्या कालपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांकडून तिचा शोध सुरू होता. मात्र, ती सापडली नाही. दुसरी घटना मयडे पुलाजवळची आहे.
एका ज्येष्ठ महिलेने पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. उडी मारताना तिला पाहणाऱ्यांनी त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. नदीपात्रातून काढून पोलिसांच्या मदतीने त्यांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या महिलेची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. या दोन्ही प्रकरणी पोलिसांत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.