पणजी : सावधान! तुमचे बँक खाते आणि सिम कार्ड सांभाळा. सायबर गुन्हेगारांची यावर नजर असून ते तुमच्याशी संपर्क करतील. अतिशय कमी व्याज दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवतील आणि लोन अॅप डाऊनलोड करायला सांगून तुम्हाला गंडा घालतील. यामुळे सावध राहा, असा इशारा सायबर गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिला आहे.
राज्यात दिवसेंदिवस सायबर गुन्हे घडत आहेत. गुन्हेगार वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी वापरून अनेकांची बँक खाती खाली करत आहेत. तुमचे बँक खाते आणि सिम भाड्याने द्या आणि भरपूर कमिशन कमवा, असा नवीन फंडा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून वापरत आहेत. याला अनेकजण बळीही पडले आहेत. यासाठी सावधानतेचा इशारा दिला गेला आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासात असे दिसून आले आहे की, फसवणूक करणारे तरुणांना त्यांचे बँक खाते आणि सिम कार्ड भाड्याने देण्यासाठी, गेमिंग अॅप्सचा वापर करून प्रलोभन म्हणून लक्ष्य करतात आणि नंतर गुन्हेगारी कारवायांसाठी वैयक्तिक माहितीचा वापर करतात.
सायबर फसवणूक करणारे सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे तरुणांना भेटतात आणि त्यांना त्यांचे बँक खाते आणि सिम कार्ड भाड्याने देण्यास प्रवृत्त करतात. यावेळी त्यांना आर्थिक व्यवहारानुसार कमिशन देण्याचे आमिष दाखवले जाते. अधिक पैसे कमावता येतील या आशेने अनेकजण आपली बँक खाती आणि सिम कार्ड भाड्याने देतात. प्रत्यक्षात फसवणूक करणारे भाड्याने दिलेल्या बँक खाती आणि सिम कार्ड आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये वापरतात. थोड्याशा प्रलोभनाने अनेक युवक प्रत्यक्ष फसवणूक न करताही सायबर गुन्ह्यात अडकतात. 20 ते 25 वयोगटातील तरुणांना ते लक्ष्य करतात. टेलिग्रामच्या गटांवरील क्रिप्टो ट्रेडिंग देखील असेच तरुणांना आकर्षित करत आहे. सायबर क्षेत्रामधील बहुतेक बेकायदेशीर व्यवसाय अशा पद्धतीने चालवले जातात. यामुळे कुणीही अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन गुप्ता यांनी केले. सायबर गुन्हेगारांकडून तरुणांना टास्क बेस्ड नोकर्यांचे आमिष दाखवले जाते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सायबर फसवणूक करणार्यांचा कणा म्हणजे बँक खाते आणि सिम कार्ड. काही प्रकरणांमध्ये, ते ग्राहकांना स्वस्त कर्ज देतात आणि त्यांना कर्ज अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. ते लक्ष्यित व्यक्तीला 10,000 रुपये देतात, परंतु एकदा अॅप डाउनलोड झाल्यानंतर ते फोनवर नियंत्रण मिळवून सर्व संपर्कांमध्ये प्रवेश करतात. एकदा संपर्कांमध्ये प्रवेश केला की, फसवणूक करणारे त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात, असे उघड झाले की, 20 ते 25 वयोगटातील अनेक तरुण त्यांचे बँक खाते भाड्याने देत आहेत. परंतु, त्यांना पैसे जमा करणार्या लोकांच्या पार्श्वभूमीची माहिती नसते.