पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला मोठे यश मिळाले आहे. नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बाबू (३५) या एका संशयित शूटरला क्राईम ब्रांच पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातून अटक केली आहे.
दुसऱ्या शूटरचा शोध पोलीस घेत आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने शनिवारी संध्याकाळी ही कारवाई केली. पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर बाबू हा नेपाळमार्गे पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, सीमा ओलांडण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरपैकी बाबू हा एक असल्याचा संशय आहे. त्याला गोव्यात आणण्यात आले असून, गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी काझू शेख, इसरार अली आणि सुरज आचार्य या तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, तपासाची दिशा निश्चित करून बाबूचा माग काढण्यात आल्याचे समजते.
गोळीबारासाठी शूटरची नियुक्ती कोणी केली, त्यामागील नेमका हेतू काय होता आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू आहे. बाबूच्या अटकेमुळे या प्रकरणातील तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
हा गोळीबार पूर्वनियोजित कट करून करण्यात आला हे बाबू याने प्रथमदर्शनी उघड केले आहे. तो गोव्यात आला तेव्हा कुठे राहत होता याचा शोध पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या सुरज आचार्य याच्याशी बाबू याची ओळख होती. त्याच्यातून हा कट रचण्यात आला. पळून जाण्यासाठी वापरण्यात आलेली वाहनांची माहिती पोलीस जमा करत आहेत.