गोवा

Atal Setu Calangute Route | अटल सेतूवरून पर्वरी, कळंगुट अन् कांदोळीचा प्रवास आता अधिक सुकर! नवीन मार्ग वाहतुकीसाठी खुला

Atal Setu Calangute Route | वाहनांची गती कमी करण्यासाठी रम्बलर ; मंत्री रोहन खंवटे यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अटल सेतूवरून पर्वरीत जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांसाठी बुधवारी नव्या उड्डाण पुलाजवळून मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे मेरशी जंक्शनला वळसा घालून नव्या मांडवी पुलावरून पर्वरी असा प्रवास करण्याऐवजी आता थेट जाता येणार आहे. त्यामुळे पर्वरीतून कळंगुट, कांदोळीकडे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी सोयीचे ठरणार आहे.

स्थानिक आमदार तथा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनीही या प्रवेश बंदीला विरोध करत पर्वरीवासीयांना या पुलाचा उपयोग करता येण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री, खात्याचे अधिकारी, वाहतूक पोलीस आणि स्थानिक आमदार यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली.

ज्यामध्ये या पुलाचा वापर पर्वरीवासीयांसाठी करण्यासाठी काय सुविधा देता येतील यावर विचारविनिमय करण्यात आला. त्यानुसार बुधवारी सकाळपासून मेरशीहून म्हापसाच्या दिशेने जाणाऱ्या अटल सेतूच्या मार्गावरील नव्या उड्डाण पुलाच्या सुरुवातीला पर्वरीसाठी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. येथे रम्बलर घालण्याबरोबरच रिफ्लेक्टर्स बसवण्यात आले आहेत.

याबाबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, सोमवारच्या बैठकीत सात दिवसांत पुलासंबंधी पर्वरीवासीयांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

आज सकाळपासून कांदोळी, कळंगुट, वेरे, ब्रिटोनाच्या दिशेने जाण्यासाठी अटल सेतूवरून मार्ग हवा होता तो खुला केला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांच्या समस्या योग्य पद्धतीने सोडवण्याच्या संबंधित खात्याला सूचना दिलेल्या आहेत.

पोलिसांकडून सतत निरीक्षण

पर्वरीतील नवा सहापदरी उड्डाणपूल आणि अटल सेतू यामधील रस्त्याच्या दुभाजकावर वाहतूक पोलिसांकडून वेग मर्यादा टिपण्यासाठी कॅमेऱ्यासह वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार अटल सेतूकडून कळंगुटच्या दिशेने जाणारा एक मार्ग खुला करण्यात आला आहे. त्याचा वापर वाहनचालकांनी काळजीपूर्वक करावा. यासाठी अटल सेतूवरून पर्वरीच्या जवळ आल्यावर वाहनाचा वेग कमी करून डाव्या बाजूने यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT