पणजी : पुढारी वृत्तसेवा
बांधकाम परवानगीसाठी केवळ कागदोपत्री नकाशे पुरेसे नसून प्रत्यक्ष जागेवर कायदेशीर रस्ता असणे अनिवार्य आहे, असे निरीक्षण नोंदवत आसगाव येथील रायगो होम्सचा बांधकाम परवाना रद्द करताना सत्र न्यायालयाने अतिरिक्त पंचायत संचालकांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.
त्यामुळे रोमिओ लेन नाईट क्लबपाठोपाठ या संचालकाचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. ६ है न्यायालयाने आदेशात तांत्रिक त्रुटी आणि जैवविविधता समितीच्या हरकतींकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदवत आसगाव पंचायतीचा मूळ आदेश कायम ठेवला आहे. रायगो होम्स प्रा. लि.ने आपल्याच जमिनीवर संरक्षक भिंत बांधण्याकरिता बांधकाम परवान्यासाठी आसगाव पंचायतीकडे केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. पंचायतीच्या आदेशाला रायगो होम्स कंपनीने पंचायत संचालकांकडे आव्हान दिले होते.
अतिरिक्त पंचायत संचालकांनी परवाना देण्याचा आदेश दिला होता त्याला आसगाव पंचायतीने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने वांधकाम परवाना रद्द करत पंचायतीचा निर्णय कायम ठेवला आहे. आसगावमधील सर्व्हे क्र. ६९/१ या जमिनीवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी रायगो होम्सने आसगाव पंचायतीकडे परवानगी मागितली होती. मात्र, १९ एप्रिल २०२५ रोजी पंचायतीने हा अर्ज फेटाळला होता. या जमिनीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नाही, जमिनीची हद्द निश्चित नाही आणि ती जमीन घनदाट वनक्षेत्रात येते, अशी कारणे पंचायतीने दिली होती.