पणजी : क्रांतिराज सम्राट
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कितीही प्रगत झाली, तरी ती मानवी मेंदू आणि भावनांची जागा घेऊ शकत नाही. एआय हे मानवी सर्जनशीलतेला मदत करणारे साधन आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांमुळे चित्रपट निर्मितीसमोर नवी आव्हाने उभी राहत असली, तरी त्यातून कथाकथनाच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे, असे मत इफ्फीचे महोत्सव संचालक आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
ते म्हणाले, एआयमधील बदलांचा वेग इतका मोठा आहे की तीन महिन्यांपूर्वी घेतलेला निर्णयही पुढील तीन महिन्यांत बदलू शकतो. एखादा चित्रपट किंवा उत्पादन तयार करण्यासाठी सहा महिने लागतात; मात्र तोपर्यंत एआय अधिक प्रगत आणि दर्जेदार झालेले असते. त्याचे रिझोल्यूशन आणि सूक्ष्मता वाढत असते.
त्यामुळे या तंत्रज्ञानाचा शेवट कुठे असेल, हे सांगता येत नाही. एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या चित्रपटांच्या स्वामित्वहक्कांचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. जगभरातील सरकारे यासंबंधी नियमावली आणि वास्तवाचा विचार करत आहेत. त्यातून सर्वांना मान्य होईल असा मार्ग निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची प्रक्रिया यापूर्वीही घडली आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमधील स्पेल चेक सुविधेमुळे प्रूफरीडिंगच्या कामाचे स्वरूप बदलले. मूकपटांमध्ये आवाज आला आणि कृष्णधवल चित्रपटांत रंग आले, तेव्हाही सुरुवातीला विरोध झाला होता. मात्र, प्रत्येक वेळी तंत्रज्ञान स्वीकारावे लागले. त्यामुळे एआयबाबतही तशीच भूमिका असावी, असे गोवारीकर म्हणाले.
एआयमुळे चित्रपटांचा आशय संपणार नाही. 'लंचबॉक्स', 'मसान' आणि 'होमबाउंड'सारखे आशयप्रधान चित्रपट भविष्यातही तयार होत राहतील. मात्र, नव्या तांत्रिक साधनांमुळे मिथके, कल्पनारम्य कथा आणि 'चंदामामा'च्या गोष्टी पडद्यावर आणण्याची संधी वाढली आहे. 'महाभारत' आणि 'कृष्णगाथा'सारख्या कथा आता अधिक व्यापक स्वरूपात साकारता येतील. भविष्यात चित्रपट कोणत्या तंत्रज्ञानातून तयार झाला, यापेक्षा त्याची कथा महत्त्वाची ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यंदा इफ्फीमध्ये अॅनिमेशन, माहितीपट आणि चित्रपटांवरील चित्रपट अशा तीन नव्या श्रेणी सुरू करण्यात आल्या. मास्टरक्लासमध्येही काही नवीन विषयांचा समावेश केला. सबटायटलिंगवर प्रथमच स्वतंत्र मास्टरक्लास आयोजित करण्यात आला. भाषांतरादरम्यान काही गोष्टी हरवू शकतात, त्यामुळे सबटायटलिंग हा महत्त्वाचा विषय आहे. रसिकांनी महोत्सवाबाबत टीकात्मक मते आणि सूचना मांडल्यास त्यांचे स्वागत करून आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे गोवारीकर यांनी स्पष्ट केले.
इफ्फीचे महोत्सव संचालक म्हणून पहिल्यांदाच जबाबदारी सांभाळण्याचा अनुभव आनंददायी असल्याचे गोवारीकर यांनी सांगितले. प्रिव्ह्यू कमिटीसोबत चित्रपट निवडण्याची प्रक्रिया त्यांनी अनुभवली. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटांचा व्यापक आवाका प्रतिनिधींना पाहता यावा, यासाठी चित्रपटांची निवड आणि मांडणी करण्यावर भर दिला. 'धुरंधर'सोबत लडाखी भाषेतील 'बिकमिंग'सारख्या चित्रपटालाही महत्त्व देण्यात आले. विविध भाषांतील चित्रपटांना इफ्फीमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.