IFFI 2026 
गोवा

IFFI 2026 |इफ्फीतील स्पर्धा परीक्षक मंडळाचे भारतीय अध्यक्ष

IFFI 2026 International Jury Chairperson Indian | इफ्फीतील स्पर्धा परीक्षक मंडळाचे भारतीय अध्यक्ष

पुढारी वृत्तसेवा

पणजी : २०११ मध्ये गोव्यात ४२ वा इफ्फी आयोजित करण्यात आला होता, तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षक मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून नामांकन करण्याचा मान अदूर गोपालकृष्णन यांना दिला. अनेक भारतीयांनी हे अध्यक्षपद भूषविले आहे.

अदूर गोपालकृष्णन हे भारतातील अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त समकालीन चित्रपट निर्माते, पटकथालेखक आणि निर्मात आहेत. गोपालकृष्णन यांनी १६ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि १७ केरळ राज्य चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना १९८४ मध्ये पद्मश्री आणि २००६ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ते दादासाहेब फाळके पुरस्काराचे (२००४) मानकरी आहेत, जो चित्रपट क्षेत्रातील आजीवन योगदानासाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यांना जे. सी. डॅनियल पुरस्कार (२०१६) प्रदान करण्यात आला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी केरळ सरकारचा सर्वोच्च सन्मान, त्यांच्या सलग ६ चित्रपटांसाठी त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक महासंघ, आंतरराष्ट्रीय समीक्षक पुरस्कार जिंकले. त्यांनी फ्रान्स सरकारकडून प्रदान करण्यात आलेला कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स आणि १९८२ मध्ये त्यांच्या एलिप्पथायम (रेंट-ट्रॅप) या चित्रपटासाठी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट सदरलैंड ट्रॉफी, युनिसेफ आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकले.

सत्यजित रे आणि मृणाल सेन यांच्यासह त्यांचे जवळजवळ सर्व चित्रपट व्हेनिस, कान्स आणि टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रथम प्रदर्शित झाले. जागतिक चित्रपटसृष्टीत ते सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या भारतीय चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांचे चित्रपट कान्स, व्हेनिस, बर्लिन, टोरंटो, लंडन, रॉटरडॅम आणि जगभरातील प्रत्येक महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवात दाखवले गेले आहेत.

२०१२ मध्ये गौतम घोष यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. गौतम हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, संगीत दिग्दर्शक आणि छायाचित्रकार आहेत, जे प्रामुख्याने बंगाली चित्रपटसृष्टीत काम करतात. १९९७ मध्ये इटलीचा व्हिटोरियो डी सिका पुरस्कार मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत. २०१२ मध्ये पश्चिम बंगाल सरकारने त्यांना आजीवन योगदानासाठी बंगा विभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २०१७ मध्ये त्यांचा ऑस्कर अकादमीचे सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.

२०१० मध्ये गोवा येथे आयोजित ४१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण मयूर पुरस्कार मिळवण्याचा मान त्यांना मिळाला आहे. जुलै २००६ मध्ये त्यांना स्टार ऑफ द इटालियन सॉलिडेरिटी ही नाइटहुड पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार शेखर कुलभूषण कपूर यांची २०१५ मध्ये ४६ व्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

शेखर कपूर हे भारतीय चित्रपट निर्मात असून बाफ्टा (बीएएफटीए) पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नॅशनल बोर्ड ऑफ रिव्ह्यू पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक सन्मानांचे मानकरी आहेत. तसेच त्यांना गोल्डन ग्लोबसाठी नामांकनही मिळाले आहे. १९९४ मध्ये कुप्रसिद्ध भारतीय दरोडेखोर आणि राजकारणी फूलन देवी यांच्या जीवनावर आधारित बैंडिट क्वीन या चरित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आणि प्रशंसा मिळाली.

या चित्रपटाचा प्रीमियर १९९४ च्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या डायरेक्टर्स फोर्टनाइट विभागात झाला आणि एडिनबर्ग चित्रपट महोत्सवातही तो दाखवण्यात आला. १९९८ मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिच्या कारकिर्दीवर आधारित काल्पनिक कथानक असलेल्या एलिझाबेथ या ऐतिहासिक चित्रपटामुळे कपूर यांना आणखी आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली, या चित्रपटाला सात अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर त्यांनी द फोर फेदर्स (२००२) या युद्धपटाचे दिग्दर्शन केले. २००७ मध्ये त्यांनी १९९८ च्या चित्रपटाचा पुढील भाग एलिझाबेथ: द गोल्डन दिग्दर्शित केला.

शेखर कपूर यांना २००० मध्ये पदाश्री आणि २०२५ मध्ये भारताचा तिसरा सवर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. ३० सप्टेंबर २०२० ते १ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ते भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे अध्यक्ष होते. २०२२ मध्ये ५३ व्या इफ्फीच्या पुरस्कार वितरण समारंभात घडलेल्या एका कटू घटनेनंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षक मंडळाचे भारतीय अध्यक्ष नियुक्त करण्याचे सुज्ञ पाऊल उचलले. तेव्हापासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ५४ व्या, ५५ व्या, ५६ व्या आणि अगदी ५७ व्या इफ्फीमध्येही सर्व भारतीय अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या घटनेनंतर लगेचच ५४ व्या इफ्फी मध्ये शेखर कपूर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

२०२४ मध्ये ५५ व्या इफ्फीच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली. आशुतोष गोवारीकर हे भास्तीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, पटकथालेखक आणि निर्माते आहेत, जे भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात. लगान (२००१) हा ऐतिहासिक क्रीडापट, स्वदेस (२००४) हा सामाजिक चित्रपट आणि जोधा अकबर (२००८) हा ऐतिहासिक प्रेमपट दिग्दर्शित करण्यासाठी ते विशेष ओळखले जातात. लगान आणि जोधा अकबरसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. लगानला ७४व्या अकाद‌मी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. ज्यामुळे ते अकादमी पुरस्कारांचे मतदान सदस्य बनले.

समीक्षकांनी प्रशंसा केलेल्या व्हेंटिलेटर (२०१६) या विनोदी नाट्यचित्रपटात मुख्य भूमिका साकारून त्यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. राकेश ओमप्रकाश मेहरा यांची २०२५ मध्ये ५६व्या इफ्फीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

राकेश ओमप्रकाश मेहरा हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अधूनमधून अभिनय करणारे अभिनेते आणि पटकथालेखक आहेत. रंग दे बसंती या नाट्यचित्रपटाचे आणि भाग मिल्खा भाग या चरित्रात्मक क्रीडापटाचे लेखन व दिग्दर्शन करण्यासाठी ते विशेष ओळखले जातात. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्यांनी अक्स (२००१) या अलौकिक अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे आणि दिल्ली (२००९) या नाट्यचित्रपटाचे लेखन व दिग्दर्शनही केले.

२० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गोवा येथे आयोजित होणाऱ्या ५७ व्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी आनंद एल. राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आनंद एल. राय हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात आहेत. तनु वेड्स मनु, (२०११) आणि त्याचा पुढील भाग तनु वेड्स मनु रिटर्न्स (२०१५) हे रोमॅटिक विनोदी नाट्यचित्रपट तसेच रांझणा (२०१३) या रोमॅटिक नाटचचित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ते ओळखले जातात. यापैकी नंतरच्या दोन चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०२४) सोहळ्यात, २२ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरातमधील एकता नगर, केवडिया येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक' या माहितीपटासाठी त्यांना बिगर-वैशिष्टयपूर्ण चित्रपट श्रेणीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT