होंडा : पुढारी वृत्तसेवा
रॅगिंग हा शिक्षण क्षेत्रातील गंभीर गुन्हा आहे. नवे विद्यार्थी घाबरून नाही तर आत्मविश्वासाने शिकावे, यासाठी रॅगिंगला कठोर विरोध आवश्यक आहे. रॅगिंगमुळे तरुणांच्या मनावर आघात होऊन त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते.
त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यान, शिक्षकाने आणि समाजाने रॅगिंगविरोधी मोहिमेला सर्व स्तरातून पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अॅड. शिवाजी देसाई यांनी केले. येथील होंडा सत्तरी फिजिओथेरपी (शारीरिक उपचार) महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी अधिकार ग्रहण कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या, तक्रार निवारण यंत्रणा या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. स्नेहा भागवत, डॉ. गौरी एलुरकर, डॉ. सुदर्शन शेंडे, डॉ. राधा भेंडे, डॉ. साईली कामत बांबोळकर आदी मान्यवर उपस्थित होते अॅड. शिवाजी देसाई पुढे म्हणाले की महाविद्यालयीन परिसरात रॅगिंग पूर्णपणे कायद्याने प्रतिबंधित आहे. रॅगिंग रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे.
नव्या विद्यार्थ्यांना रॅगिंग विरुद्ध जागृती, संरक्षण आणि प्रक्रिया यांची माहिती आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी खूप मोठी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यान शिस्त, सभ्यता आणि जबाबदारीने वागले पाहिजे. महाविद्यालयीन नियमावली आणि कायद्याचे पालन केले पाहिजे. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सन २००१ साली रॅगिंग वर पूर्ण पणे बंदी घातलेली आहे. प्रत्येक महाविद्यालयात अँटी रॅगिंग समिती असायला हवी. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यास कडक दंड, निलंबन, दंडात्मक कारवाई आणि आणि नोंदणी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. रॅगिंग करून विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाच नाही, असेही ते म्हणाले.