भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हणजूण जि. पं. मतदारसंघात यंदा हायव्होल्टेज लढत होत आहे.
काँग्रेसने योगेश गोवेकर यांना उमेदवारी दिल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे.
भाजप, काँग्रेस, आप, आरजी आणि अपक्ष असे पाच उमेदवार रिंगणात आहेत.
अपक्ष उमेदवार बलभीम मालवणकर यांच्यामुळे निवडणुकीची गणिते बदलू शकतात.
म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या हणजूण जिल्हा पंचायत मतदार संघात बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेसने तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे येथे हायहोल्टेज लढत होणार आहे, असे चित्र आहे. शिवोली विधानसभा मतदारसंघात शिवोली व हणजूण असे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ आहेत. यातील हणजूण जिल्हा पंचायत मतदार संघात हणजूण कायसुव, आसगाव व वेर्ला काणका यातील पंचायतीचा समावेश आहे.
हणजूण जिल्हा पंचायत मतदार संघातून ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात बलभीम मालवणकर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, मिर्गेल क्यूरोज हे रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे उमेदवार, भारतीय जनता पक्षातर्फे नारायण मांद्रेकर, आम आदमी पक्षातर्फे पूजन मालवणकर व काँग्रेस पक्षातर्फे योगेश गोवेकर हे निवडणूक लढवत आहेत.
अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे बलभीम मालवणकर हे शापोरा बोट मालक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता; परंतु काँग्रेसने योगेश गोवेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
भाजपतर्फे निवडणूक लढवणारे नारायण मांद्रेकर हे भाजपाचे सुरुवातीपासूनचे कट्टर कार्यकर्ते आहेत. मावळत्या जिल्हा पंचायत सदस्य निहारिका मांद्रेकर यांचे ते पती आहेत. मिंगेल क्यूरोज हे आरजीचे कार्यकर्ते आहेत, तर पूजन मालवणकर हे आपचे शिवोली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आहेत.
मोरॉम्बो काँग्रेसकडून रिंगणात
काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणारे योगेश गोवेकर हे टॅक्सी व्यावसायिकांचे नेते आहेत. टॅक्सी व्यवसायिकांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी नेहमी ते अग्रेसर असतात. त्यांना मोगॅम्बो या नावाने ओळखले जाते. सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवले होते; परंतु काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
खरी लढत काँग्रेस-भाजपमध्येच
शिवोली मतदार संघाच्या आमदार डिलायला लोबो व माजी आमदार दयानंद मांद्रेकर हे दोघेही नारायण मांद्रेकर यांचा प्रचार हिरीरीने करीत आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असला तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत डिलायला लोबो या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या होत्या, त्या काँग्रेसमधून पुन्हा भाजपात गेल्यामुळे त्यांच्याविषयी थोडी नाराजी पसरलेली आहे, याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून केला जात असल्यामुळे या मतदारसंघात खरी लढत काँग्रेस व भाजप अशी होणार आहे. आपचे उमेदवार पूजन मालवणकर यांच्या प्रचारासाठी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही या ठिकाणी येऊन लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.