Churchill Alemao 
गोवा

Churchill Alemao | आगामी विधानसभेत आलेमाव कुटुंबाचा पुन्हा घराणेशाहीचा प्रयोग? गोव्याच्या राजकारणात खळबळ

Churchill Alemao | युरी, चर्चिल, वालंकासह वॉरनही रिंगणात उतरण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या राजकारणात एकेकाळी वर्चस्व गाजविणाऱ्या मात्र, २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीला कंटाळून मतदारांनी घरी बसवलेल्या आलेमाव कुटुंबाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घराणेशाहीचा प्रयोग सुरू केला आहे.

बाणावली मतदारसंघात माजी मंत्री चर्चिल आलेमाव आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक असून, नावेली मतदारसंघात कन्या वालंका आलेमाव यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाजवळ पुन्हा जवळीक साधल्याचे चित्र आहे.

चर्चिल यांचे पुतणे तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे पुन्हा कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढवतील, यात शंका नाही. मात्र चर्चिलचे दुसरे पुतणे वॉरन आलेमाव यांनी बाणावली मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत काका चर्चिल यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरण्याची तयारी सुरू केल्यामुळे घराणेशाही बरोबर आलेमाव कुटुंबातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.

घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आलेमाव कुटुंबाला लोकांनी घरचा रस्ता दाखवला होता. यंदा पुन्हा आलेमाव कुटुंबातील चार सदस्य पुन्हा काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. मात्र, यावेळी विरोधकांपेक्षा स्वतःच्या कुटुंबातील राजकीय महत्त्वाकांक्षाच आलेमाव कुटुंबासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विशेष म्हणजे, बाणावली मतदारसंघातून उमेदवारीसाठी वॉरन आलेमाव यांनी दाखविलेली उत्सुकता ही चर्चिल आलेमाव यांच्या राजकीय योजनांसमोर मोठे आव्हान ठरणार असल्याचे बोलले जात असून, यामुळे आलेमाव कुटुंबात अंतर्गत फूट पडण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या राजकारणात आलेमाव कुटुंबाचा प्रभाव अनेक वर्षे राहिला. चर्चिल आलेमाव आणि जोआकिम आलेमाव या भावांनी मंत्रिपदासह महत्त्वाची राजकीय पदे भूषविली. त्यानंतर कुटुंबातील पुढील पिढीला राजकारणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत चर्चिल आलेमाव, जोआकिम आलेमाव, चर्चिल यांची कन्या वालंका आलेमाव आणि जोआकिम यांचे पुत्र युरी आलेमाव असे एकाच कुटुंबातील चार सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

मात्र, मतदारांनी हा घराणेशाहीचा प्रयोग स्पष्टपणे नाकारला. नावेली मतदारसंघात चर्चिल आलेमाव यांचा भाजप समर्थक अपक्ष आलेक्सिन फर्नांडो यांनी पराभव केला. कुंकळ्ळी मतदारसंघात जोआकिम आलेमाव यांचा भाजपचे सुभाष नाईक यांनी पराभव केला होता. बाणावली मतदारसंघात चर्चिल यांची कन्या वालंका आलेमाव यांचा गोवा विकास पक्षाचे कायेतान सिल्व्हा यांनी पराभव केला, तर सांगे मतदारसंघात युरी आलेमाव यांचा भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांनी अल्प मताधिक्याने पराभव केला होता.

त्या निवडणुकीनंतर राज्यभर घराणेशाहीला मतदारांनी नाकारले, अशी प्रतिक्रिया उमटली होती. काँग्रेसने एकाच कुटुंबातील चार जणांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली होती. मतदारांनीही व्यक्ती केंद्रित आणि कुटुंब केंद्रित राजकारणापेक्षा पर्यायी नेतृत्वाला पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले होते.


आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा त्याच प्रकारचे चित्र दिसू लागले आहे. चर्चिल आलेमाव बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी त्यांची कन्या वालंका आलेमाव यांना नावेली मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेले युरी आलेमाव हे कुंकळ्ळी मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

यादरम्यान चर्चिल आलेमाव यांचे पुतणे वॉरन आलेमाव यांनी बाणावली मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कामाला सुरुवात केल्यामुळे आगामी काळात एकाच मतदारसंघातून काका आणि पुतण्यामध्ये अप्रत्यक्ष राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.


राजकीय विश्लेषकांच्या मते, बाणावली मतदारसंघात उमेदवारीचा प्रश्न हा काँग्रेससमोर मोठा पेच ठरणार आहे. सध्या आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी बनवली मतदारसंघात आपला पाया मजबूत करून लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी आघाडी कायम राहिल्यास बाणावली मतदारसंघ आम आदमीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.

चर्चिल आलेमाव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यासमोर वॉरन आलेमाव यांनी दावा कायम ठेवल्यास आलेमाव कुटुंबातील मतभेद उघडपणे समोर येऊ शकतात. पक्षाने कोणत्याही एका बाजूने निर्णय घेतल्यास दुसऱ्या बाजूच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, २०१२ मध्ये घराणेशाहीचा प्रयोग मतदारांनी नाकारला होता. तरीही पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कुटुंबातील अनेक सदस्यांना राजकीय संधी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याने काँग्रेसमध्येही या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

त्यातच वॉरन आलेमाव यांच्या वाढत्या राजकीय सक्रियतेमुळे आलेमाव कुटुंबातील अंतर्गत एकोपा टिकणार की राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे कुटुंबात फूट पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आगामी काही महिन्यांत काँग्रेसची उमेदवारी निश्चित होताच आलेमाव कुटुंबातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होतील. मात्र, सध्याच्या घडीला घराणेशाहीचा पुनरुच्चार आणि वॉरन आलेमाव यांच्यामुळे निर्माण झालेली अंतर्गत स्पर्धा हेच गोव्याच्या राजकारणातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहेत.

केवळ आलेमाव यांचीच घराणेशाही नाही : चर्चिल

याविषयी चर्चिल आलेमाव यांना विचारले असता, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, मायकल लोबो, दिलायला लोबो, विश्वजित राणे, देविया राणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यात घराणेशाही केवळ आलेमाव कुटुंबीयच करीत नाही. कन्या वालंका यांना काँग्रेस नावेली मतदारसंघातून उमेदवारी देत असल्यास मी बाणावली मतदारसंघातून माघार घेण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT