पणजी : दीपक जाधव
पुणे येथील व्यावसायिक आणि कारवार म्हणून येथील मूळ रहिवासी असलेले विनायक उर्फ राजू नाईक यांची 22 सप्टेंबर रोजी पाच जणांच्या टोळक्याने घरात घुसून हत्या केली होती. विनायक नाईक यांच्या हत्येचा संशय असलेला गुरुप्रसाद राणे याचा मृतदेह घटनेच्या अवघ्या चौथ्या दिवशी मांडवी खाडीत आढळल्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक यांच्या पत्नीचीही चौकशी करत असून आतापर्यंत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
कारवार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवार तालुक्यातील हणकोण येथे रविवारी दि 22 रोजी पहाटे ५ : ३० वाजता नाईक यांच्या घरात पाच जणांच्या टोळीने घुसून त्यांच्यावर तलवारीने वार करून त्यांची हत्या केली. नाईक हे पुणे येथील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचा व्यवसाय करीत होते. नाईक हे जत्रेनिमित्त हणकोण येथे आपल्या मूळ गावी आले होते. रविवारी ते पुन्हा पुण्याला जाणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांची हत्या करण्यात आली.
या हल्ल्यात नाईक यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर कारवार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सदाशिवगड चित्तपूर पोलिस करत आहेत. आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य सूत्रधार गुरुप्रसाद राणे (रा. फोंडा - गोवा ) हा असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र बुधवारी २५ रोजी सकाळी गुरुप्रसाद राणे याचा मृतदेह मांडवी खाडीत दिवाडी फेरीजवळ मिळाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.