पणजी, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील काही पोलिस मद्य, ड्रग्ज, जुगाराच्या व्यसनाला बळी पडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अशा पोलिसांवर ठेवण्याचे आदेश पोलिस मुख्यालयातून देण्यात आले आहेत. पणजी पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी हे आदेश काढले आहेत.
कामावर असताना मद्य, ड्रग्ज व जुगाराच्या व्यसनाला बळी पडण्याचे प्रमाण पोलिस खात्यात वाढत चालले आहे. ड्युटीवर असतानाच नशेत किंवा ड्रग्जच्या अंमलाखाली कर्मचारी असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. वेगवेगळ्या जुगारी अड्ड्यांवरील पोलिसांची हजेरीही वाढल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख तथा अधीक्षकांना तत्काळ पाहणी करून अशा पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत.
पोलिस कर्मचार्यांनी वारंवार रजेवर जाणे, आरोग्याचे प्रश्न निर्माण होणे किंवा घरगुती हिंसाचार आणि कौटुंबिक वादाची प्रकरणेही आता समोर येत आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम पोलिस खात्यावर होत असल्यामुळे आता या गोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पोलिस खात्यालाच वाटू लागली आहे. त्यामुळे व्यसनी पोलिसावर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दे़ण्यात आले आहेत.
व्यसनांत गुरफटलेल्या पोलिस कर्मचार्यांना व्यसनांतून मुक्त करण्यासाठी समुपदेशकांची मदतही घेण्यात येते. परंतु या व्यसनांचे प्रमाण कमी होत नसल्याने शेवटी कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.