एकतर्फी प्रेम प्रकरणातून अ‍ॅसिड हल्ला 
गोवा

Goa acid attack : एकतर्फी प्रेम प्रकरणातून अ‍ॅसिड हल्ला

जखमी युवकाच्या वडिलांचा दावा, हल्लेखोरास 2 दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

पेडणे ः धारगळ येथे एका अल्पवयीन कॉलेज युवकावर अ‍ॅसिड फेकण्याचा जो प्रकार संशयिताने केला तो एकतर्फी प्रेमातून झाल्याचा दावा आता जखमी युवकाच्या वडिलांनी केला आहे. मंगळवारी संशयित हल्लेखोरास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयिताला गुरुवार, दि. 3 रोजी सकाळी 10 वा. बाल न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले. संशयिताच्या विरोधात 124 (1) 109 आणि गोवा बाल कायद्याच्या कलम 8/2 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोर हा करासवाडा औद्योगिक वसाहतीत एका गार्डनमध्ये कामाला होता. त्याने रासायनिक द्रव्य करासवाडा येथील औद्योगिक वसाहतीतील एका काच उत्पादन कंपनीतून पाच लिटर अ‍ॅसिडने भरलेला कॅन चोरून आणला होता. मागील आठ दिवसांपासून गार्डनर म्हणून तो त्या ठिकाणी काम करत होता.

हल्लेखोराच्या शरिरावर अ‍ॅसिडचे निशाण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संशयिताचे हेल्मेट आणि रेनकोटसह स्कूटर पोलिसांनी जप्त केली. स्कूटरवर अ‍ॅसिडचे ठिपके आढळल्याने त्या स्कूटरची ठसे तज्ज्ञांनी तपासणी केली होती. चोरी झालेल्या अ‍ॅसिड कॅनवर म्हापसा पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयित हल्लेखोराची मुलगी व जखमी अवस्थेत असलेला मुलगा हे दोघेही म्हापशातील एका कॉलेजमध्ये एकत्रितपणे शिक्षण घेत होते. तिथेच त्यांची मैत्री जुळली. मुलगीने अनेकदा त्या मुलाला वेगवेगळे एसएमएस पाठवले होते. मुलाचा मुलीने पाठलाग करून घरापर्यंत पोचली होती. त्यावेळी मुलाच्या आईने तिची चौकशी केली असता त्या मुलीने आपण त्याच्यावर प्रेम करते असे सांगितले होते. परंतु मुलाने आपण तिच्यावर प्रेम करत नाही, ती एकतर्फी प्रेम करते, असे स्पष्ट केले. आई-वडिलांनी त्या मुलीची समजूत काढून तिला घरी पाठवून दिलं. परंतु अधून मधून रात्री-अपरात्री मुलगी मुलाला मोबाईलद्वारे वेगवेगळे एसएमएस पाठवून धमकी देत होती, असा आरोप युवकाच्या वडिलांनी केला आहे.

जीवाचे काहीतरी बरेवाईट करण्यासंदर्भातील हे मेसेज होते. त्याच अनुषंगाने ती मुलगी इस्पितळात उपचारासाठी दाखल झाली होती. या संदर्भातील माहिती जुने गोवे पोलिस ठाण्यात कामास असलेल्या तिच्या मावशीने आपणास दिल्याची माहिती जखमी युवकाच्या वडिलांनी दिली. त्या मुलीची आम्ही गोमेकॉ इस्पितळात जावून पाहणी केली असता ती बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्याचवेळी हल्लेखोर संशयिताने आम्हाला तुम्ही घाबरू नका, तुमची काही चूक नाही. असे सांगितले होते. त्यानंतर आठ दिवसांनी त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यावेळी संशयित आणि मावशीने सिंधुदुर्ग पोलिस ठाण्यात आमच्या विरोधात गुन्हा नोंदवला. आणि ती तक्रार मोप पोलिस ठाण्यात देण्यात आली. आम्ही पोलिसांना सर्व प्रकारचे जे पूर्वीचे एसएमएस, धमकीचे प्रकार व सर्व पुरावे पोलिसांना सादर केले आहेत. संशयिताने पूर्व नियोजित कट रचून आपल्या मुलाला संपवण्याचा जो कट रचल्याचा दावा युवकाच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे पुढील तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT