गोवा

Goa - आप, आरजीला 'हात'; फॉरवर्डचे काय?

Vijai Sardesai on Goa | काँग्रेसबरोबर दोन दिवसांत चर्चा : विजय सरदेसाईंची भूमिका गुलदस्त्यात

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी

आम आदमी पक्ष आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स काँग्रेसबरोबर युतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. त्यांच्यात दोन दिवसांत चर्चाही होणार आहे. मात्र युतीतील मूळ पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपला हरवायचे असेल, तर युती करण्याची गरज सर्वच विरोधी पक्षांना आहे, तरीही सर्वजण एकत्र का येत नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेससोबत चर्चा स्थगित केल्याचे म्हटले होते, तर फातोर्डा काँग्रेस गटाने अचानक सोशल मीडियावर 'फातोर्थ्यात एकच वाट, काँग्रेसचा हात' असा संदेश देत, फातोर्डा मतदारसंघाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात युतीचे नेमके काय होते, सरदेसाई नेमकी काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

स्थानिक पातळीवर चर्चा पूर्ण होऊन निर्णय झाल्यानंतरच अंतिम मान्यतेसाठी तो हायकमांडकडे पाठवला जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता युतीबाबतच्या राजकीय प्रक्रियेला अचानक वेग आला आहे. आप व आरजीसोबत येत्या एक ते दोन दिवसांत युतीबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय युतीबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या भूमिकेची आणि निर्णयाची काँग्रेस प्रतीक्षा करणार असल्याचेही चोडणकर यांनी सांगितले.

दरम्यान, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना युतीबाबत भाष्य केले. आरजीचे नेते आमदार वीरेश बोरकर आणि 'आप'चे राज्य संघटक वाल्मिकी नाईक हे आपापल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांत व्यग्र असल्याने आतापर्यंत त्यांच्याशी थेट चर्चा होऊ शकली नव्हती; मात्र येत्या दोन दिवसांत त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला जाईल, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.

आम्ही सरदेसाई यांची वाट पाहू : चोडणकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, 'गोवा फॉरवर्डने युती संबंधीची बोलणी तूर्त स्थगित ठेवली आहे, त्या अर्थी त्या पक्षाने आधी स्थगितीचा निर्णय मागे घेणारा ठराव घ्यावा लागेल. विधानसभा निवडणुकीसाठीच्या युतीसाठी विजय सरदेसाई यांची निश्चितच वाट पाहू'. दरम्यान, काँग्रेसने आरजीपी आणि आपसोबत चर्चा पुढे नेण्याचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आपली स्वतंत्र राजकीय मोहीम थांबवलेली नाही. फॉरवर्ड पक्षाने राज्यव्यापी यात्रा काढण्याची तयारीही केली आहे.

काँग्रेसशी अधिकृत चर्चा करणार : बोरकर

युतीच्या चर्चेसाठी आरजी पक्षही तितकाच उत्सुक असून त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती आरजीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी दिली. लवकरच आरजीच्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसशी अधिकृत चर्चा करण्यासाठी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही समिती कार्यरत होईल, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT