पणजी : सत्ताधारी भाजपमधीलच नेते एकमेकांवर अमली पदार्थ विक्रीचा आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यापूर्वी किनारी भागातील एका भाजपच्याच आमदाराने राज्यात अमली पदार्थांचा प्रादुर्भाव झाला आहे, असा आरोप केला होता. त्यावरून सत्ताधारी भाजप पक्षातील नेत्यांच्या कथित ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशारा आपचे प्रदेश समन्वयक अॅड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
यावेळी पक्षाचे नेते संदेश तळेकर उपस्थित होते. ते म्हणाले, भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर, माजी आमदार बाबू आजगावकर एकमेकांवर गांजा विक्रीचा आरोप करत आहे. याशिवाय मायकल लोबो यांनीही राज्यात ड्रग्जचा प्रादुर्भाव झाला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याची चौकशी होणे आवश्यक आहे. केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभाग, सीबीआय, राज्य सरकारचे अमलीपदार्थ विरोधी विभागाने यांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास आम्ही न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.