पणजी : येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलताना अभिनेता आमिर खान. 
गोवा

Actor Aamir Khan | ...तरच भारत चित्रपट निर्मितीत बनेल शक्तिशाली

अभिनेता आमिर खान यांचे परखड मत : नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

काव्या कोळस्कर

पणजी : देशातील चित्रपट संस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी आणि वैयक्तिक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व राज्यात अधिकाधिक चित्रपटगृह तयार होणे गरजेचे आहे. सध्याच्या घडीला सर्वत्र साधारणपणे 9000 स्क्रीन्स आहेत. मात्र, यांची संख्या वाढल्यानंतरच खर्‍या अर्थाने देशात चित्रपट संस्कृती रुजून याचा फायदा दिग्दर्शक, निर्माते आणि नवोदित कलाकारांना होऊ शकेल. यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अधिक सिनेमागृह बनले तर आपला देश शक्तिशाली चित्रपट निर्मिती करणारा देश बनेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांनी केले.

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फायरसाइड चॅट सत्रात “द नरेटीव्ह आर्किटेक्ट ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन अँड इन्क्लुसिव्हिटी“ या विषयावर आयोजित सत्रात आमिर खान यांनी देशातील सिनेसृष्टीला अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक बारद्वाज रंगन यांनी सत्राची धुरा सांभाळली.

आमिर खान यांच्या सिनेमागृहांच्या उभारणीच्या मुद्द्यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले की, भारत सरकारतर्फे सर्व राज्यांच्या सिनेमागृहांचे अवलोकन करण्यात आले असून “मॉडेल स्टेट रिव्हॉल्युशन“ उपक्रमांतर्गत तीन महिन्यांमध्ये नवीन सिनेमागृह उभारण्याची आणि एक महिन्यांमध्ये ते सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. याअंतर्गत सिनेमांना पुन्हा एकदा चित्रपटगहात घेऊन जाण्यासाठी आणि देशात चित्रपट संस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी सरकारतर्फे आवश्यक पावले उचलली जात आहे. सत्रात कारकिर्दीच्या सुरुवातीबाबत आमिर खान म्हणाले की, माझ्यावर लहानपणापासूनच वाचन, चित्रपट आणि त्यातील गाण्यांचा दांडगा प्रभाव पडला आहे. यामुळेच या क्षेत्राकडे वळलो. मला पुन्हा पुन्हा त्याच कथानकावर काम करणे आवडत नाही. त्याऐवजी प्रेक्षकांना काय बघायला आवडते, याचा अभ्यास करून थोड्या आऊट ऑफ द बॉक्स आणि कठीण संकल्पना मी निवडतो.

समीक्षक बारद्वाज यांनी सिनेसृष्टीच्या विविध पैलूंवर आधारित विचारलेल्या बाबींवर आमिर खान यांनी अगदी समर्पक आणि उदाहरणासह उत्तरे दिली. त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमधील किस्से सांगितले. ते म्हणाले की, प्रत्येक चित्रपट करताना मी मोठा विडाच उचलला असल्याचे मला जाणवत असे. ते चित्रपट चालतील की नाही याची देखील मला शाश्वती नसे. मात्र कुठेतरी प्रेक्षकांचे प्रेम आणि देवाच्या आशीर्वादामुळेच आज मी इथवर पोहोचू शकलो. भूमिकेचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेता असे विचारले असता, आमिर म्हणाले की, कथानक समजून घेतल्यानंतर भूमिकेच्या डोक्यात शिरून मी त्या व्यक्तीचा विचार करतो. ही व्यक्ती कशा पद्धतीने विचार करत असेल, कसा प्रतिसाद देत असेल, दैनंदिन जीवनातील तिच्या सवयी, यांचा विचार आणि अभ्यास केल्यानंतर ती भूमिका मी स्वतः मध्ये अंगीकारतो.

मी सामाजिक कार्यकर्ता नव्हे!

आमिर खान म्हणाले, माझ्या बहुतांश चित्रपटांमध्ये सामाजिक संदेश असला तरी मी सामाजिक कार्यकर्ता नाही. मी उत्तम कलाकार असल्यामुळेच या भूमिका परखडपणे मांडू शकतो. हे ऐकणे प्रेक्षकांसाठी थोडे विचित्र असले, तरी हेच सत्य आहे. अर्थात उत्तम संकल्पना आणि त्यात सामाजिक संदेश, अशा कथानकांवर काम करणे मला सर्वाधिक आवडते. त्यामुळेच माझ्या चित्रपटांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात, असे मला वाटते.

अन् सभागृह खचाखच भरले

दरवर्षी ठराविक दिग्गजांच्या मास्टरक्लासला कला अकादमीचे सभागृह पूर्ण भरते. यंदाच्या सत्रामध्ये आमिर खान यांना ऐकण्यासाठी तब्बल तासभर आधी सभागृहाबाहेर रांगा लागल्या होत्या. अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत सभागृह खचाखच भरले होते. अनेकजण तर शेवटपर्यंत उभेच होते.

दिग्दर्शनावर खूप प्रेम...

दिग्दर्शनावर माझे खूप मोठे प्रेम आहे. चित्रपट निर्मिती ही बाब मला सर्वात जास्त आवडते. मी एकदा दिग्दर्शन केले होते. पण ज्या दिवशी मी जाणीवपूर्वक दिग्दर्शन स्वीकारण्याचा निर्णय घेईन, त्या दिवशी मी कदाचित अभिनय थांबवेन. कारण ते मला पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घ्यावे लागेल. म्हणूनच मी सध्या तो निर्णय पुढे ढकलत आहे, असे आमिर खान यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT