पणजी : राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी गोवा कर्मचारी निवड आयोगाने एकूण 752 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यातील 50 पदे भरली आहेत, आणि उर्वरित सर्व रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्यांच्या हस्ते पाटो-पणजी येथे गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, सदस्य नारायण सावंत उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, आता सर्व सरकारी विभागांतील भरती प्रक्रिया आयोगामार्फतच पार पडणार आहे. संगणकाधारित परीक्षा आणि तत्काळ निकाल प्रणालीमुळे निवड प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित होणार आहे. राज्यातील सरकारी नोकरभरतीत पारदर्शकतेचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. संगणकीय प्रणालीमुळे कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप न होता, उमेदवारांची निवड पूर्णपणे पात्रतेनुसार केली जाणार आहे. आयोगाचे नव्याने सुसज्ज करण्यात आलेले कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून, परीक्षेसाठी स्वतंत्र संगणक कक्ष, निगराणीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, तसेच ऑनलाइन अर्ज व परीक्षा प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन यात समाविष्ट आहे.
राज्यातील गट क आणि गट ब श्रेणीतील सर्व शासकीय पदभरती आता आयोगाच्या माध्यमातूनच होणार आहे. शासनाने याबाबत स्पष्ट आदेश जारी केला आहे. कोणताही विभाग स्वतंत्रपणे भरती प्रक्रिया राबवू शकणार नाही, आम्ही केवळ रोजगार देत नाही, तर गोमंतकीय युवकांना न्याय देतो. योग्य पात्रतेनुसार आणि पारदर्शक पद्धतीने भरती झाल्यास शासनावरचा विश्वास अधिक दृढ होतो. असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.