पणजी : आशुतोष गोवारीकर यांच्यासह फादरलँडची टीम. 
गोवा

Iffi | 'फादरलँड'च्या इंडिया प्रीमियरने ५७ व्या इफ्फीचा दिमाखात शुभारंभ

57th IFFI 2026 Opening Film Fatherland - विभागलेल्या युद्धोत्तर जर्मनीची प्रेक्षकांसमोर हृदयस्पर्शी कथा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी

युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या, विचारधारेने विभागलेल्या आणि भूतकाळाच्या ओझ्याखाली दबलेल्या राष्ट्राच्या प्रवासाने आज गोव्यात ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) शुभारंभ झाला. नामवंत दिग्दर्शक पावेल पावलीकोव्स्की यांच्या 'फादरलँड' (ओयचिड़ना) या चित्रपटाच्या इंडिया प्रीमियरने नऊ दिवसांच्या या महोत्सवाची सुरुवात झाली.

शीतयुद्धाच्या उंबरठ्यावरील युद्धोत्तर जर्मनीचे भावस्पर्शी चित्र या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आले. ऑस्कर विजेते दिग्दर्शक पावलीकोव्स्की या ंच्या या कृष्णधवल नाट्यपटात इतिहास, कौटुंबिक नाती आणि विभागलेल्या मातृभूमीची गुंतागुंत यांचा वेध घेण्यात आला आहे. नोबेल पुरस्कार विजेते जर्मन लेखक थॉमस मान आणि त्यांची मुलगी एरिका यांच्या कथेतून हा प्रवास उलगडतो.

आयनॉक्सच्या सर्व प्रदर्शनगृहांमध्ये या चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनापूर्वी 'फादरलँड'च्या निर्मात्या एवा पुश्चिन्स्का, नवी दिल्लीतील पोलंड दूतावासाचे मिशन प्रमुख पिओत्र अँटोनी श्विताल्स्की आणि नवी दिल्लीतील पोलिश इन्स्टिट्यूटच्या संचालिका मालगोर्झाटा वेज्सिस-गोलेबियाक यांनी पणजीतील आयनॉक्स येथे रेड कार्पेटवरून आगमन केले.

चित्रपटाविषयी बोलताना एवा पुश्चिन्स्का यांनी सांगितले की, या चित्रपटाची निर्मितीच इफ्फीच्या संकल्पनेचे मूर्त रूप आहे. 'फादरलँड' हा जर्मन लेखक आणि जर्मन लोकांची जर्मन भाषेतील कथा सांगत असला, तरी तो संपूर्णपणे पोलिश मनाने आणि हातांनी तयार झाला आहे. यातूनच महोत्सवाचे 'सीमा नसलेल्या कथा' हे ब्रीदवाक्य प्रतिबिंबित होते.

पिओत्र अँटोनी श्विताल्स्की म्हणाले की, भारत आणि पोलंड यांच्यातील मैत्री अनेक आयामांमध्ये वाढत असली, तरी संस्कृती हाच त्याचा सर्वात भक्कम पाया आहे. पावेल पावलीकोव्स्की यांनी पारंपरिक पोलिश चित्रपट शाळेला नवी दृष्टी आणि नवा दृष्टिकोन दिला, असेही ते म्हणाले.

पोलंड-भारत सर्जनशील नाते

पाहुण्यांचा सत्कार करताना माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार म्हणाले की, 'फादरलँड' हा पोलंड आणि भारत यांच्यातील सर्जनशील संबंध साजरा करण्याची विशेष संधी आहे. यावेळी इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार आणि इफ्फीचे कलात्मक संचालक पंकज सक्सेना उपस्थित होते.

विभागलेल्या जर्मनीतून पिता-पुत्रीचा प्रवास

१९४९ च्या उन्हाळ्यात, उद‌योन्मुख शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर 'फादरलँड'ची कथा घडते. अमेरिकेत सोळा वर्षांच्या वनवासानंतर थॉमस मान आणि त्यांची मुलगी एरिका जर्मनीला परततात. काळ्या ब्यूक गाडीतून दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसाचे चटके सोसणाऱ्या देशातून ते अमेरिकेच्या ताब्यातील फ्रैंकफर्ट ते सोव्हिएत नियंत्रणाखालील वायमर असा प्रवास करतात. मान यांच्यासाठी ही परतणूक केवळ मायदेशी परतणे नाही. युद्धाने बदललेल्या आणि परस्परविरोधी राजकीय विचारधारांनी फाटलेल्या मातृभूमीशी ही भेट आहे. प्रवास पुढे सरकत जातो तसा देशाच्या विभागणीचा प्रतिध्वनी मान कुटुंबाच्या गुंतागुंतीत उमटतो आणि आपलेपणा, ओळख, स्मृती आणि सलोखा यांसारखे प्रश्न ऐरणीवर येतात. सँड्रा ह्युलर आणि हॅन्स झिश्लर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा ८२ मिनिटांचा चित्रपट पोलंड, जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांची सहनिर्मिती आहे. यावर्षी कान्स, सॅन सेबॅस्टियन आणि टेल्युराइडसह प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट झळकला. या चित्रपटासाठी पावलीकोव्स्की यांना कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT