फोंडा : श्री गोकर्ण पर्तगाळ मठाच्या 550 व्या वर्धापनदिन सोहळ्यात बुधवारी ढवळी फोंडा येथील लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनी ‘स्वर अर्चना‘ हा सांघिक कार्यक्रम सादर करून सगळ्या प्रेक्षागृहाला भारावून टाकले. या कार्यक्रमाला परमपूज्य श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामीजींनी उपस्थित राहून दिव्यांग मुलांच्या गायनाचे श्रवण केले आणि त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून पुन्हा एकदा अशा पद्धतीचे व्यासपीठ पर्तगाळ मठाच्या माध्यमातून या मुलांना देण्याचा विचारही स्वामींनी व्यक्त केला.
‘स्वर अर्चना’ कार्यक्रमात गायक तनिष कीनालकर यांनी ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती कुश लव रामायण गाती‘ ओकार अनादि अनंत अथांग अपरंपार, ‘कानडा राजा पंढरीचा’ व सेतू बांधा रे अशी एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. रसिकांनी त्याच आवेशाने त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. गायिका सारा दलाल हिने गीतरामायणातील ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला’, ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ तसेच ‘आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे’ ही गाणी आपल्या सुरेल कंठाने सुबद्धपणे गाऊन रसिकांना आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले, त्यांना रसिकांनी टाळ्या वाजवून पसंती दिली.
मेघना नाईक हिने ‘सावळा ग पांडुरंग, माझ्या मांडीवर न्हातो, तसेच ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर’ ही गाणी अतिशय समरसतेने आणि तन्मयतेने गाऊन रसिकांना आपल्या कंठमाधुर्याची चुणूक दाखविली. रसिकांनी त्यांच्या गाण्याची मुक्तकंठाने प्रसंसा केली. गायक साईश गावठाणकर यांनी सादर केलेल्या ‘नकोस गंगे पार करू, नकोस नौके परत फिरू‘ हे ग. दि. माडगूळकरांचे प्रसिद्ध गीत सादर करून रसिकांकडून वाहव्वा मिळवली.
कीबोर्ड वादक सुरेश घाडी यांनी सुरेख साथ केली. संवादिनीवर महेश धामस्कर यांनी, तबल्यावर विद्याधर नाईक यांनी तर ऑक्टोपॅडवर महादेव गावडे होते. या कार्यक्रमाला लोकविश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे निर्माते अनुप प्रियोळकर उपस्थित होते. संगीत संयोजक कमल पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सूत्रसंचालन दुर्गाकुमार नावती यांनी केले. यावेळी स्वामीजींच्या हस्ते शाल आणि फल मंत्राक्षता तसेच श्रीरामांची प्रतिमा देऊन संस्थेचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर यांचा गौरव करण्यात आला. तर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्या कलाकारांचा शाल तसेच फल मंत्राक्षता देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक विनोद सतरकर, सविता देसाई, सारिका च्यारी आदींनी सहकार्य केले.