खांडोळा : मुरगाव वारकरी संस्थेची निघालेली वारी. Pudhari File Photo
गोवा

Goa : वसा वारीचा घेतला पावलांनी...

41 वारकरी पालख्या पंढरपूरकडे; 45 हजार भाविकांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

पणजी : ‘राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी’, ‘विठ्ठल विठ्ठल गजरी’, ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ अशा गजराने सध्या गोमंतक दुमदुमत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे वारकरी निघाले असून राज्यभरातून 41 मंडळाच्या वारी सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी रवाना झाल्या आहेत. सुमारे 45 हजार वारकरी यात सहभागी झाले आहेत. सोबत संत तुकाराम, संत ज्ञानदेव आदी संताच्या पालख्या घेऊन ही भक्त मंडळी सुमारे 15 ते 17 दिवस चालत पंढरपूरला जाणार आहेत.

दक्षिण गोव्यातून निघालेली पथके काही दिवस अगोदर निघतात, तर केरी, साखळी परिसरातील पथके रविवारी 22 रोजी मार्गक्रमण करणार आहेत. एका पथकामध्ये कमीत कमी 70 व जास्तीत जास्त 200 भाविक सहभागी होत असल्याने पंढऱपूरकडे जाणार्‍या वारकर्‍यांची संख्या 45 हजारांच्या घरात पोचणार आहे. गोव्यातून पंढरपूरला जाण्यासाठी काही वारकरी मंडळे साखळी-केरी-चोर्लाघाट मार्गे चंदगड-पंढरपूर असा प्रवास करतात, तर काही वारकरी मंडळे दोडामार्ग तिलारी घाट मार्गे जातात. अनेक वर्षे एकाच मार्गाने जाणार्‍या वारकरी मंडळाचे निवासाचे ठिकाणी ठरलेले असते. निवास असणार्‍या गावात भजन, कीर्तन, महाप्रसाद होतो. पहाटे उठून पुन्हा पुढच्या टप्पा गाठण्यासाठी हे वारकरी मंडळ पायी पुढे जातात. ऊन, पावसाची तमा न करता विठ्ठल भेटीची ध्यास घेऊन वारकरी चालत असतात. सर्व पथकासोबत एक दोन मोठी वाहने असतात. त्यात साहित्य, कपडे ठेवले जातात. परतीचा प्रवास हा बसने केला जातो.

भक्तीत अनिश्चितता संपवण्याचे बळ : तवडकर

काणकोण येथून सभापती रमेश तवडकर यांनी दोन पालख्यांना हिरवा झेंडा दाखवला. एक पाळोळे येथून आणि दुसरी राजबाग येथून निघाली. यावेळी तवडकर यांनी जीवनातील अनिश्चितता संपवण्याचे बळ भक्तीत असल्याचे सांगितले. माजी आमदार विजय पै खोत यांनी मुख्यमंत्र्यांनी 416 किमी लांबीच्या पायी वारीच्या मार्गावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. काणकोणातील सुमारे 250 वारकरी सहभागी झाले आहेत.

श्वानही निघाले वारीला...

वास्कोमध्ये आमदार कृष्णा साळकर हे भगवान दामोदर मंदिरात मुरगावच्यावच्या वारकर्‍यांमध्ये सहभागी झाले होते. येथील वारकरी 15 दिवसांचा, 500 किमीचा प्रवास करणार आहेत. या वारीत भाविकांसह गतवर्षी प्रमाणे यावर्षीही ‘माऊली’ नावाचा श्वानही सहभागी झाला आहे.

6 जुलैला पोहोचणार

मुरगाव वारकरी संस्था, संभाजीनगर वास्कोची वारी शुक्रवारी सकाळी 11 च्या दरम्यान खांडोळा येथे पोचली. ही वारी शुक्रवारी 20 रोजी वास्कोहून निघाली होती. ही वारी 6 जुलै रोजी पंढरपूरला पोचेल, अशी माहिती पथकाचे प्रमुख दिलीप मालवणकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT