पत्रादेवी येथे जप्त केलेले दारूचे बॉक्स, बाजूला अबकारी खात्याचे अधिकारी. (छाया : निवृत्ती शिरोडकर) 
गोवा

400 liquor boxes hidden under onions seized|कांद्याखाली लपवले होते चारशे दारूचे बॉक्स

चालक घटनास्थळावरून पसार : पत्रादेवी अबकारी नाक्यावर मद्य वाहतूक उघड

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : गोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या वाहनातून शुक्रवारी (दि. २८) मध्यरात्री कांद्याच्याआड चारशे मद्याचे बॉक्स लपवून वाहतूक करण्याचा प्रकार पत्रादेवी येथील अबकारी तपासणी नाक्यावर उघडकीस आला. त्याची किंमत सुमारे ५१ लाख रुपये आहे. तसेच वाहनाची अंदाजे किंमत १० ते १२ लाख रुपये आहे, अशी माहिती अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईमुळे सीमावर्ती भागातील मद्यवाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अधिक माहितीनुसार, संबंधित वाहन (एमएच-१४-ईएम-८९६९) गोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने जात होते. पत्रादेवी अबकारी तपासणी नाक्यावर कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवून त्यातील मालाबाबत चालकाकडे विचारणा केली.

त्यावेळी वाहनात खराब कांदे असल्याचे चालकाने सांगितले. रात्रीची वेळ असल्याने कर्मचाऱ्यांनी वाहन बाजूला घेण्याची सूचना केली. एका कर्मचाऱ्याने वाहनातील मालाची बारकाईने पाहणी केली असता कांद्यांच्या खाली काही बॉक्स असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. संशय आल्याने याबाबत तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. प्र

करणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित वाहन ताब्यात ठेवण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यापूर्वीच वाहनचालक घटनास्थळावरून गायब झाल्याची माहिती आहे. त्यानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली असता कांद्याच्या आड लपवून ठेवलेले मद्याचे सुमारे चारशे बॉक्स आढळल्याची माहिती मिळाली. अबकारी विभागाने वाहनासह मद्यसाठा ताब्यात घेतला. दरम्यान, पसार झालेल्या चालकाचा शोध, वाहनाच्या मालकाची माहिती, या कथित मद्य वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अबकारी विभागाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT